नरेगा योजनेची चौकशी करा; पाथरवाला येथील गोवर्धन मस्के या तरुणाचे पंचायत समितीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन
गेवराई | प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील पाथरवाला येथील गोवर्धन मस्के या तरुणाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा/नरेगा) अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी करत सोमवारी (दि. 29 जून) दुपारी पंचायत समितीच्या इमारतीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली.
आंदोलनकर्त्याने नरेगा अंतर्गत झालेल्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवून ताब्यात घेतले. या प्रकारामुळे काही काळ पंचायत समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील कारवाई पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, आंदोलनकर्त्याच्या मागण्यांबाबत प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.