बीड
कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचा मातृभूमी प्रतिष्ठानकडून सन्मान

कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचा मातृभूमी प्रतिष्ठानकडून सन्मान
बीड (प्रतिनिधी ) : –
कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता, लोकाभिमुख प्रशासन आणि प्रभावी कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई तथा प्रभारी पोलीस अधीक्षक, बीड आदरणीय चेतना तिडके यांचा मातृभूमी प्रतिष्ठान, बीड, लेक लाडकी अभियान बीड जिल्हा आणि महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, महिलांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे तसेच जनतेशी सुसंवाद ठेवून लोकाभिमुख पोलीस प्रशासन उभे करण्यासाठी चेतना तिडके यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे, मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे, ज्येष्ठ नागरिक सुधीर देशमुख, किशोर कुलकर्णी, शाम मार्कंडे, शेख पाशा, नितीन जायभाये तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी चेतना तिडके यांच्या प्रामाणिक, संवेदनशील व लोककेंद्रित कार्यपद्धतीचे कौतुक करत, पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा अधिकाऱ्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.सन्मानाला उत्तर देताना चेतना तिडके यांनी हा सन्मान संपूर्ण पोलीस दलाचा असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सहकार्यामुळेच कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येते, असे नमूद करत समाजहितासाठी पोलीस प्रशासन भविष्यातही तत्परतेने कार्य करत राहील, असा विश्वास चेतना तिडके यांनी व्यक्त केला.



