बीड
संकुचित विचार सोडून कौटुंबिक एकी जपा; संयम शौर्याचे खरे भूषण: प्रसाद महाराज काष्टे

संकुचित विचार सोडून कौटुंबिक एकी जपा; संयम शौर्याचे खरे भूषण: प्रसाद महाराज काष्टे
बीड | दिनांक १९ (प्रतिनिधी)
सामर्थ्य, शौर्य आणि धाडस हे माणसाचे गुण त्याचे भूषण असले, तरी शौर्याचे खरे भूषण हे ‘संयम’ राखण्यात आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने मनगटातील ताकदीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करत जीवनात संयमी होण्याचा प्रयत्न करावा. संपत्तीसाठी भावा-भावांमध्ये होणारे तंटे आपल्या संतांच्या महाराष्ट्र भूमीला मुळीच शोभणारे नाहीत. संकुचित विचार सोडून हा व्यापक विचार प्रत्येकाने केला, तर घराघरांतील भांडणे कायमची मिटतील. हे सद्विचार संत सानिध्यातूनच निर्माण होत असल्याने प्रत्येकाने आयुष्यात जाणीवपूर्वक संतांची संगत धरावी, असे आवाहन प्रवचनकार प्रसाद महाराज काष्टे यांनी येथे केले.
आषाढी वारीचे औचित्य साधून शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये ‘नीतीशतक’ या संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कथा निरूपण करताना ते बोलत होते. कथेच्या प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष गौतम खटोड यांनी कथाकार प्रसाद महाराज काष्टे यांचा सत्कार केला.
‘नीतीशतक’ ग्रंथातील विविध प्रसंगांचे अभ्यासपूर्ण दाखले देत महाराज पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती इथे आपले कर्म घेऊन जन्माला आली आहे. आजचा माणूस इतरांचे अनुकरण करण्याकडे जास्त लक्ष देतो, मात्र प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या कामासाठी बनलेली असते. तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योगाभिमुख होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजातील वाढत्या दिखाऊपणावर बोट ठेवत त्यांनी अल्पज्ञानी लोकांपेक्षा मौन कधीही चांगले, असा सल्ला दिला. ते म्हणाले, ज्ञानासोबत माणसाला संयम आवश्यक असतो. विद्वत्ता कितीही असली तरी जीवनातील सहजता आणि साधेपणा कधीही सोडू नये. संपत्ती कितीही असो, पण माणसाचा विवेक जागृत असला पाहिजे. प्रत्येकाने आई-वडिलांच्या सेवेसाठी आपले जीवन सत्कारणी लावावे, माणसांमधील प्रेम-आपुलकी ओळखावी, मनात इतरांबद्दल दया बाळगावी, असे आवाहनही प्रसाद महाराज काष्टे यांनी आपल्या निरूपणातून केले. या संगीतमय कथेला बीडमधील श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.



