पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची तपपूर्ती; ना. पंकजाताई मुंडेंनी सोमनाथ, द्वारकेसह प्रसिध्द धार्मिक स्थळांचे घेतले दर्शन; महा आरती, वृक्षारोपणही केले

मोदींच्या दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना
मुंबई दि. १३ — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या यशस्वी कारकिर्दीला बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी द्वारका, सोमनाथ ज्योतिर्लिंगासह विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन दर्शन घेतले. याठिकाणी त्यांनी महा आरती केली आणि वृक्षारोपणही केले. पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी यावेळी प्रार्थनाही केली.
ना. पंकजाताई मुंडे यांनी आई प्रज्ञाताई आणि बहिण माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्यासह ११ ते १३ जून दरम्यान द्वारका, सोमनाथ या तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन भगवान श्रीकृष्ण, महादेवाचे दर्शन घेत आईच्या चारधाम यात्रेचा संकल्प पूर्ण केला.
पहिल्या दिवशी देवभूमी द्वारकेत जाऊन त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी तपपूर्तीबद्दल महा आरती व वृक्षारोपण केले. प्रभू श्रीकृष्णांचे अवतार कार्य जिथे समाप्त झाले, त्या भालका तीर्थला भेट दिली, बलरामांनी जिथे अवतार संपवला ते शेषनाग मंदिर, श्री गीता मंदिर गोलकधाम, दांडी हनुमान, नागेश्वर ज्योतिर्लिंग, सुदर्शन सेतू, गुजरातमध्ये वेरावळजवळ प्रभास पाटन येथे असलेले सोमनाथ मंदिराचे त्यांनी दर्शन घेतले. हे मंदिर केवळ एक पूजास्थान नसून, भारताच्या सांस्कृतिक सातत्याचे एक जिवंत प्रतीक आहे.
आईचा चारधाम करण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या औचित्याने आज या भक्तिमय प्रवासादरम्यान श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे अत्यंत भक्तीभावाने दर्शन आणि अभिषेक करण्याचे भाग्य लाभले असल्याचे त्या म्हणाल्या.दिव येथे निसर्गाचा चमत्कार असलेल्या गंगेश्वर महादेवाचे ही त्यांनी दर्शन घेतले.
मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
——–
या दौऱ्यात ना. पंकजाताई मुंडे यांनी विविध प्रसिद्ध अशा धार्मिक स्थळांचे दर्शन घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. तीनही दिवसाच्या दौऱ्यात भाजपचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांचे सर्व ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.



