बीड
भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली लक्ष्मण रेषा कूचकामी ठरणार काय?

भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली लक्ष्मण रेषा कूचकामी ठरणार काय?
जनता फाउंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
बीड (प्रतिनिधी) – शहरातील भाजी मंडई च्या मुख्य रस्त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आखून दिलेली लक्ष्मण रेषा कुचकामी ठरणार काय? असा सवाल जनता फाउंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, काही दिवसांपूर्वी भाजी मंडईच्या मुख्य रस्त्यावर मधोमध बसून भाजीपाला विकणाऱ्यांवर शासन-प्रशासनाच्या आदेशावरून बीड नगरपरिषदेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून अतिक्रमण हटाव मोहिमेची कारवाई केली. कारवाई योग्य व रास्त असताना काही लोकांनी त्यात जाणून-बुजून राजकारण आणले तर काहींनी त्यास धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केला. यामुळे निर्माण झालेल्या दबाव तंत्रासमोर झुकून विद्यमान सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी यांनी अक्षरशः लोटांगण घेत संबंधित अतिक्रमण करणाऱ्या आजीमाय ची माफी मागणे, घरी जाऊन भेटी देत साड्या लुगडे व आर्थिक मदत देणे असे काही बाही कृत्य केले. हे पाहून फक्त बीड शहरच नाही तर बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही बीड शहराचे व नगरपालिकेचे हसू झाले आहे.
अतिक्रमण हटाव चे आदेश देणाऱ्यांनीच नंतर या मोहिमेत कर्तव्यावर असलेल्या एका अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले तर दुसऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली हे पाहून राजकारण किती खालच्या स्तराला गेले आहे हे दिसून आले.
आजीमायला रस्त्याच्या ज्या मध्यभागावरून उठविण्यात आले होते त्याच जागी दुसरे अजून चार-पाच विक्रेते बसून व्यवसाय करू लागले आहेत. ज्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या रहदारीला आणि वाहतुकीला नेहमीप्रमाणेच त्रास होऊ लागला आहे.
हा त्रास कमी होता की काय, या आजी मायचा मुलगा मंडईत येऊन सुनील केंद्रेकर साहेबांनी आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेच्या आत आपला व्यवसाय करणाऱ्यांनाही नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची नावे घेऊन धमक्या देऊ लागला आहे. लक्ष्मण रेषा-फेषा काही नाही, आता बघतोच कोण आम्हाला रस्त्यावरून पुन्हा उठवितो ते आणि रेषेच्या आत किंवा बाहेर कोणी कसा धंदा करतो ते, असे म्हणत मंडईत व्यवसाय करणारे भाजीपाला विक्रेते आणि फळ फळावर विक्रेत्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण करू लागला आहे.
यामुळे विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून त्याच्या अशा प्रकारे धमक्या देण्यामागे त्याच्या मागे शासन-प्रशासन, नेते, लोकप्रतिनिधी यापैकी कोणाची फूस आहे? किंवा त्याला कोण बळ देत आहे? असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहे.
शासन-प्रशासन, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन कुणीही असो या सर्वांच्या दृष्टिकोनातून भाजी मंडईच्या मुख्य रस्त्यावर ओढलेल्या लक्ष्मण रेषे बाहेर उभे राहून व्यवसाय करणे चुकीचे आहे आणि व्यावसायिकांनी रेषेच्या आतच व्यवसाय करणे त्यांच्यासह जनहिताचे सुद्धा आहे. मात्र लक्ष्मण रेषे बाहेर उभे राहून व्यवसाय करणे म्हणजे रहदारीस व रस्त्यावर अडथळा करणे आहे परंतु आजी मायचा मुलगा हा लक्ष्मण रेषेच्या आत आणि बाहेर कोणालाही व्यवसाय करू न देण्याच्या देत असलेल्या धमक्यांमागे नेमकी काय डाळ शिजत आहे? असा सवाल ही जनता फाउंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला असून निलंबित केलेल्या अधिकाऱ्याला सन्मानपूर्वक सेवेत घ्यावे तसेच दुसऱ्या अधिकाऱ्याला दिलेली कारणे दाखवा नोटीस रद्द करून मागे घेण्यात यावी तसेच अतिक्रमण धारकांचे लांगुलचालन व तुष्टीकरण बंद करावे असे आवाहन केले आहे.



