कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसऱ्यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोध

कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसऱ्यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोध
जिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार
बीड दि. १० (प्रतिनिधी ) ; देशपातळीवरील कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मनमोहन कलंत्री तर राष्ट्रीय सल्लागार म्हणून सत्यनारायण कासट यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली . त्याबद्दल कृषी साहित्य विक्रेता संघटना बीड जिल्हा आणि बीड तालुकाच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मनमोहन कलंत्री यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होणे हा केवळ त्यांचा सन्मान नससुन हा बीड जिल्हा आणि मराठवाड्याचा अभिमान असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
बीडचे भूमिपुत्र असलेल्या मनमोहन कलंत्री यांची नुकतीच कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींनी हि बिनविरोध निवड केली. त्यांच्यासोबतच सत्यनारायण कासट यांची राष्ट्रीय सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. यानिमित्ताने बीडमध्ये कृषी साहित्य विक्रेते संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके , जवाहर सारडा , संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंगद नवले , तालुकाध्यक्ष भीमराव काळे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी, समाजातील मान्यवर आणि व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मनमोहन कलंत्री यांच्या कार्याचा जिल्ह्याला अभिमान असल्याचे सांगितले. उपस्थित सर्वानीच मनमोहन कलंत्री आणि सत्यनारायण कासट यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयकिशोर बियाणी यांनी केले.
—
शेतकऱ्यांचे मित्र असल्याचे समाधान : कलंत्री
हा देश कृषिप्रधान आहे, मात्र या देशात शेतीकडे दुय्यम म्हणून पाहिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना सर्व दुय्यम समजतात तोच खऱ्याअर्थाने जगाचा पोशिंदा आहे. आणि त्या शेतकऱ्यांचे आम्ही मित्र आहोत, त्या शेतकऱ्यांसाठी आम्हाला काम करता येते याचे समाधान आणि आनंद आहे. या संघटनेच्या माध्यमातून कृषी साहित्य विक्रेत्यांचे प्रश्न सोडवले जातात, मात्र त्याहीपेक्षा अधिक काम आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो असे मनमोहन कलंत्री यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. या संघटनेच्या माध्यमातून आमचे ठिकठिकाणी सत्कार झाले, मात्र आपल्या गावात, आपल्या माणसांनी केलेल्या सन्मानाचे मूल्य फार मोठे असून हा सन्मान अधिक आनंद देणारा असल्याचे ते म्हणाले.



