बीड

डिजिटल जनगणनेला वेग; सभापती प्रा.राम शिंदे यांचे जनतेला आवाहन

डिजिटल जनगणनेला वेग; सभापती प्रा.राम शिंदे यांचे जनतेला आवाहन

चौंडी येथे स्वगणनेची सुरुवात:प्रा.राम शिंदे यांचा पुढाकार

जामखेड, दि. ५ : देशाच्या १६व्या राष्ट्रीय जनगणनेला यंदा डिजिटल स्वरूपात सुरुवात झाली असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. प्रत्येकाने स्वगणना प्रक्रियेत सहभागी होऊन देशाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
चौंडी येथे प्रा. राम शिंदे यांनी स्वतः स्वगणना करून जनगणनेचे महत्त्व अधोरेखित केले. टॅबच्या माध्यमातून घरगणनेची सर्व माहिती भरल्यानंतर त्यांचा ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ तयार झाला. या प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी नागरिकांना स्वगणना करण्याचे आवाहन केले. ही पद्धत सोपी, सुरक्षित आणि वेळ वाचवणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दि. १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध असून, त्यानंतर दि. १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणकांकडून घरोघरी जाऊन जनगणना करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे अचूक व अद्ययावत माहिती संकलित होऊन शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. डिजिटल जनगणनेमुळे प्रक्रिया सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जाणकार नागरिक, सक्षम राष्ट्र ही भावना जपत प्रत्येकाने या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हावे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वगणना ही महत्त्वाची पायरी असून, सर्वांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रा. राम शिंदे यांनी केले.

Back to top button