बीड

कर्जत-जामखेड वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे सभापती प्रा. राम शिंदेंचे निर्देश

कर्जत-जामखेड वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे सभापती प्रा. राम शिंदेंचे निर्देश

जामखेड प्रतिनिधी:

कर्जत-जामखेड तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने अखेर कठोर पावले उचलली आहेत. आज झालेल्या आढावा बैठकीत वीज वितरण व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले असून, सभापती प्रा. राम शिंदे यांनी ठाम भूमिका घेत वीज पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले.

तालुक्यातील अनियमित लोडशेडिंग, तांत्रिक बिघाड आणि ओव्हरलोडमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा फटका थेट शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवनावर होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे वीज यंत्रणेत तातडीने सुधारणा करणे अपरिहार्य असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीत देण्यात आलेले प्रमुख निर्देश असे— सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीज खंडित होणार नाही, याची खात्री करणे; ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर बदलून क्षमता वाढवणे; जुन्या वीजवाहिन्यांचे नूतनीकरण करून बिघाडांवर त्वरित उपाययोजना करणे; तसेच नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करून नागरिकांच्या तक्रारींना जलद प्रतिसाद देणे.

उन्हाळ्यातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सज्ज राहून योग्य नियोजन करावे, अन्यथा नागरिकांची गैरसोय सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट निर्देश देण्यात आले.

या बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे, प्रदीप कटकधोंड यांच्यासह कर्जत जामखेड येथील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Back to top button