ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र मानवी जीवनातील अज्ञान दूर करणारे- साध्वी अनुराधा दीदी

ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र मानवी जीवनातील अज्ञान दूर करणारे- साध्वी अनुराधा दीदी
बीडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथेला प्रारंभ
बीड (दि.५ प्रतिनिधी)
संत ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी जीवनाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जो मार्ग दाखवला, तो केवळ आध्यात्मिक नसून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा महामार्ग आहे. माऊलींचे जीवन चरित्र हे मनुष्याच्या मनातील भ्रांती आणि अज्ञान दूर करून जीवनातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे देणारे आहे, असे प्रतिपादन साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांनी केले.
येथील स्वर्गीय झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा’ सोहळ्याचा शुभारंभ मंगळवारी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ‘ओम नमो ज्ञानेश्वरा’ या मंगलाचरणाने अत्यंत भक्तिमय वातावरणात झाली. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड आणि वसंत थिगळे यांच्या हस्ते साध्वी अनुराधा दीदींचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. त्यानंतर दीदींनी आपल्या रसाळ वाणीतून माऊलींच्या पूर्वजांच्या जीवन चरित्राचा पट श्रोत्यांसमोर मांडला.साध्वी अनुराधा दीदी पुढे म्हणाल्या की,संतांनी चालवलेली भिंत असो वा, रेड्यामुखी वेद वदवणे, या चमत्कारांमागील व्यापक लोककल्याणाचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. पंढरपूरची वारी ही माणसाला कमी साधनात आनंदाने कसे जगायचे, हे शिकवते. अध्यात्म आणि संतांचे विचार मनुष्याला संकटात प्रेरणा देतात. त्यामुळेच प्रत्येकाने संत चरित्र आत्मसात करणे काळाची गरज आहे असे त्या म्हणाल्या.
या संगीतमय कथेच्या पहिल्याच दिवशी बीडमधील भाविकांची मोठी उपस्थिती होती नामसंकीर्तनातून जीवनाची सार्थकता कशी करावी, याचे मार्गदर्शन दीदींनी ओघवत्या शैलीत केले. संत नामदेव महाराजांनी वर्णन केलेले संत ज्ञानेश्वर माऊलींचे माहात्म्य आणि इतर ग्रंथकारांच्या संदर्भासह रंगलेल्या या कथेने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.माणसाने जीवनात कोणतेही भ्रम ठेवू नयेत. शुद्ध आचरण आणि नामस्मरण हाच कल्याणाचा मार्ग आहे, जो माऊलींनी सात शतकांपूर्वी जगाला दिला असे कथाभागातून साध्वी अनुराधा दीदी यांनी सांगितले.



