बीड
दारूच्या व्यसना पायी मृत झालेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवली

दारूच्या व्यसना पायी मृत झालेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी पोलिसांसारखे कर्तव्य निभावले
बीड (प्रतिनिधी) – दिनांक २७ एप्रिल २०२६ सोमवार रोजी दैनिक सिटीजन सह इतर प्रसिद्धी माध्यमातून एका अज्ञात मृत व्यक्तीचा बीडच्या रजिस्ट्री ऑफिसच्या आवारातील पत्र्याच्या कंपाउंडमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याची बातमी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्फत प्रकाशित झाली होती. अज्ञात व्यक्ती ही शहरातील समाधान, रायगड, सौरभ, कोर्ट कॅन्टीन आदी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याचे समजल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी अनेकांकडे चौकशी केली असता असे समजले की तो व्यसनाधीन होता. कामाचे ठिकाण हॉटेल सातत्याने बदलत होता. हॉटेलमध्ये कुणी गावाकडील परिचित व्यक्ती चहा किंवा नाश्त्यासाठी आली असता साथीदार वेटरला सर्विस द्यायला सांगुन परिचित व्यक्तीच्या नजरेआड राहण्याचा प्रयत्न करत होता. निवारा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य यांच्याकडून अशोक आगलावे, राहणार डोमरी, ता.पाटोदा जि. बीड येथील रहिवासी असल्याची माहिती शोधून काढली. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वसुदेव मिसाळ यांच्यामार्फत संबंधित विभागाचे सहाय्यक पोलीस अधिकारी साळवे यांची शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट घेऊन त्यांना अज्ञात व्यक्तीचे नाव व गावाचे नाव कळवले. निरगुडीचे माजी प्राचार्य डी.जी.तांदळे यांनी देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी पाटोदा येथील रोटी बँक चे संचालक संतोष गर्जे यांनी डोमरी गुरुकुल येथील सुदर्शन शिक्षका मार्फत अशोक आगलावे याचे मावसभाऊ धनंजय आगलावे यांचा शोध लागला. मृत व्यक्तीचा फोटो हा अशोक आगलावेचा असल्याचे त्यांनी सांगितले. धनंजय आगलावेशी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले सहाय्यक फौजदार साळवे, राऊत यांनी संपर्क साधून संबंधित मृत व्यक्ती विषयी माहिती देऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला त्यांना बोलवून घेतले. दिनांक ३० एप्रिल २०२६ गुरुवार रोजी सकाळी अशोकचा भाऊ नंदकुमार आगलावे इंदौरहून बीडला आला होता. त्याच्यासोबत चुलते रणधीर आगलावे, मावस भाऊ धनंजय आगलावे, बेघर निवारा केंद्राचे संचालक अभिजीत वैद्य, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे शिवाजीनगर पोलीस स्टेशन व जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून संबंधित मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेऊन शहरातील अंकुश नगर भागातील स्मशान भूमीमध्ये दुपारी दोनच्या दरम्यान अंत्यविधी केला.
मयत अशोक आगलावे हा बारावी पास होता. त्याला संगणकाचे सुद्धा ज्ञान होते. पूर्वी तो पांगरी रोड येथील दीनदयाळ संस्थेमध्ये साधारण चार-पाच वर्षांपूर्वी काम करत असल्याची माहिती मिळाली असून त्यावेळी तो व्यसन करत नव्हता. त्याचे लग्न ही झालेले नव्हते. दारूचे व्यसन जडल्यानंतर त्याने विविध हॉटेल्स मध्ये वेटर म्हणून काम केले. त्याच्याकडे आधार कार्ड, मोबाईल सुद्धा नव्हते. त्याने जिथे जिथे काम केले तिथे कुणालाही स्वतःबद्दल काहीही माहिती सांगितलेली नव्हती. तो मयत झाल्यानंतर डॉ. संजय तांदळे यांनी त्याची ओळख पटविल्यानंतर माहिती मिळाली तसेच त्याचे आई-वडील गावाकडेच राहत असून त्यांना शेतीवाडी नाही ते मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. करोणा काळात तो गावी आला होता. त्यानंतर तो गावाकडे फिराकलाच नाही. त्याला एक भाऊ असून तो इंदौर येथील एका कंपनीत काम करतो. अशी माहिती मिळाल्याचे मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी सांगितले.



