बीड
स्वराज्य शक्ती सेना पक्षाची मागणी : करुणा धनंजय मुंडे यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी द्यावी

स्वराज्य शक्ती सेना पक्षाची मागणी : करुणा धनंजय मुंडे यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संधी द्यावी
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी ठोस आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे मत स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष मुबीन भैय्या सय्यद यांनी राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या करुणा धनंजय मुंडे यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
करुणा धनंजय मुंडे यांनी कोणतेही शासकीय पद नसतानाही बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर या भागांत महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत महिलांच्या न्यायासाठी सातत्याने लढा दिला आहे.
त्यांच्या कार्यशैलीत स्पष्टता, निर्भीडपणा आणि समाजहिताची जाणीव दिसून येते. त्यामुळे त्या महिलांसाठी प्रभावी नेतृत्व ठरू शकतात, असे मत व्यक्त करण्यात आले. “महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करण्यासाठी करुणा धनंजय मुंडे यांना महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या पदाची संधी देणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून करुणा धनंजय मुंडे यांना संधी द्यावी, अशी मागणी स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष मुबीन भैय्या सय्यद यांनी केली आहे.



