“अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही मानवतेला दिलेले जीवनदान.” – राजेंद्र मस्के

रमेश गाडे कुटुंबाचा धाडसी निर्णय प्रेरणादायी..!
बीड प्रतिनिधी
राक्षसभुवनचे माजी सरपंच रमेश गाडे यांनी आपल्या ब्रेन डेड मुलगा स्वर्गीय संग्राम रमेश गाडे यांच्या अवयवदानाचा घेतलेला धाडसी व समाजोपयोगी निर्णय हा मानवतेचा आदर्श ठरल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांनी व्यक्त केले.
डॉक्टरांनी डोळे मागितले,
परंतु धाडसी बापाने पूर्ण शरीरच दान केले.
ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील अवयव अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन देऊ शकतात, या उदात्त भावनेतून गाडे कुटुंबाने घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे. स्वतःच्या अपार दुःखावर मात करत इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा हा त्याग अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे.
दि.7 मार्च दरम्यान संग्राम गाडे यांचा मृतदेह
अवयवदानासाठी बीड जिल्हा रुग्णालयातून छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांनी बीड तालुक्यातील राक्षसभुवन येथे जाऊन स्वर्गीय संग्राम गाडे यांचे वडील रमेश गाडे व त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी गाडे कुटुंबाच्या धैर्यपूर्ण निर्णयाचे कौतुक केले, “अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही मानवतेला दिलेले जीवनदान होय. अशा निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते आणि समाजात माणुसकीचा संदेश पोहोचतो,” असे मत व्यक्त केले.अशा निर्णयातून समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अवयवदान म्हणजे स्वतःच्या शरीरातील अवयव दुसऱ्याच्या जीवा साठी देणे. माणुसकीचे सात्विक दर्शन म्हणजे निस्वार्थ, पवित्र आणि करुणेने केलेली मानवी कृती होय. अवयवदान करताना व्यक्तीला कोणताही स्वार्थ नसतो; उलट दुसऱ्याला नवे जीवन मिळावे हीच भावना त्यामागे असते. त्यामुळे ही कृती मानवतेचा, करुणेचा आणि परोपकाराचा सात्विक भाव दर्शवते. म्हणूनच “अवयवदान म्हणजे माणुसकीचे सात्विक दर्शन” असे म्हणणे पूर्णपणे समर्पक ठरते.स्वतःच्या दु:खावर मात करत समाजहिताचा विचार करणारे रमेश गाडे यांचे धैर्य आणि मानवतेचा संदेश देणारा हा निर्णय बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.



