तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये ‘फनफेअर’चा जल्लोष

तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये ‘फनफेअर’चा जल्लोष
बीड (दि.१६) – देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल, बीड येथे ‘फनफेअर’ (आनंद मेळावा) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मनोरंजनासोबतच प्रत्यक्ष बाजारपेठेतील व्यवहारांचे धडे घेतले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या, तक्षशिला फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रियांका रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या उमा जगतकर प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले.
फनफेअरमध्ये विविध खेळांचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच कला व हस्तकला प्रदर्शनाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः साकारलेल्या हस्तकला वस्तू आणि चित्रांचे प्रदर्शनही यावेळी मांडण्यात आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल्सचे नियोजन आणि व्यवस्थापन केले. ज्यामध्ये, वस्तूंचे दर ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे, जमा-खर्चाचा हिशोब ठेवणे आणि नफा-तोट्याचा ताळमेळ साधणे याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



