बीड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दादांना श्रद्धांजली 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दादांना श्रद्धांजली
दादा केवळ नेते नव्हे तर लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते- आ. संदीप क्षीरसागर
बीड दि.३० (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बीड जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने राष्ट्रवादी भवन, बीड येथे शुक्रवारी (दि.३०) रोजी महाराष्ट्राचे लाडके दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
               दादा हे केवळ नेते नव्हते, तर हजारो कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. कठोर शिस्त, कामाला सर्वोच्च प्राधान्य, पारदर्शकता आणि स्वच्छतेची जाणीव हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा, आत्मविश्वास देणारा नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांच्या अकाली जाण्याने बीड जिल्ह्याने एक सक्षम नेतृत्व गमावले असून ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. अशी भावना आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या  बीड जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
आ. संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर
राष्ट्रवादी भवन येथे आयोजित अजितदादांच्या श्रद्धांजली सभेत मनोगतासाठी उभे राहातच अजित दादांबद्दल बोलताना आ. संदीप क्षीरसागर यांना गहिवरून आले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता आणि अश्रू अनावर झाले होते.
Back to top button