बीड
दुःखावर फुंकर घालणारी पत्रकारांची माणुसकी; डोंगरे कुटुंबासाठी मदत फेरीतून एक लाखांचा आधार

दुःखावर फुंकर घालणारी पत्रकारांची माणुसकी; डोंगरे कुटुंबासाठी मदत फेरीतून एक लाखांचा आधार
वडवणी | प्रतिनिधी
डोंगरेवाडी येथील ऊसतोड मजूराच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने एका कष्टकरी कुटुंबाचा आधार हिरावला गेला. पती, वडील आणि कुटुंबाचा कणा गमावल्यानंतर डोंगरे कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडले. अशा वेदनादायी क्षणी वडवणी तालुक्यातील पत्रकारांनी केवळ बातमी करत न थांबता माणुसकीची भूमिका घेत थेट मदतीसाठी पुढाकार घेतला. पत्रकारांच्या वतीने काढण्यात आलेल्या मदत फेरीला वडवणी शहरातील व्यापारी बांधवांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. व्यावसायिक, नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी डोळ्यांत पाणी आणि मनात करुणा ठेवून सढळ हाताने मदत केली. या मदत फेरीतून तब्बल एक लाख रुपयांची रक्कम जमा झाली असून ही रक्कम मृत ऊसतोड कामगाराच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या नावे बँकेत एफडी करण्यात येणार आहे.
कर्त्या पुरुषाच्या अकाली जाण्याने पोरकं झालेलं हे कुटुंब पुन्हा उभं राहावं, त्यांच्या मुलींच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, या उदात्त हेतूने पत्रकार बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविला. या संवेदनशील उपक्रमातून पत्रकारिता ही केवळ शब्दांची नव्हे, तर दुःखाच्या वेळी धावून येणारी माणुसकी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या मदत फेरीत सामाजिक कार्यकर्त्यांचाही सक्रीय सहभाग लाभला. पत्रकार बांधवांच्या या कृतिशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून, “अजूनही माणुसकी जिवंत आहे” याची प्रचिती समाजाला मिळाली आहे.



