बीड

गेवराई तालुक्यात वाळूचा उच्छाद; एक टेंडर अधिकृत, तर ९–१० गावांत अवैध उपसा?

गेवराई तालुक्यात वाळूचा उच्छाद; एक टेंडर अधिकृत, तर ९–१० गावांत अवैध उपसा?
कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन गेवराईच्या तहसीलदार कडे लक्ष देतील का ?
रात्रीच्या वेळी गोदापट्ट्यातून शंभर ते दीडशे ट्रॅक्टर डंपर रस्त्यावरून धावतात
 गेवराई (अंकुश आतकरे) गेवराई तालुक्यात मौजे गुंतेगाव येथे अधिकृतपणे एकच वाळू टेंडर सुरू असताना तालुक्यातील तब्बल नऊ ते दहा गावांमध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गोदापट्ट्यातील गावकऱ्यांकडून केला जात आहे.
               स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून दररोज शंभर ते दीडशे ट्रॅक्टर व डंपर भरून वाळू रस्त्यावरून धावताना दिसतात. त्यामुळे महसूल विभागाला याची माहिती नसणे अशक्य असल्याचेही नागरिक सांगत आहेत. विशेष म्हणजे, अधिकृत टेंडर फक्त गुंतेगाव येथे असताना इतर अनेक गावांमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याने शासनाच्या महसुला मोठा फटका बसत आहे. दरम्यान, या प्रकरणात तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करावे, अशी मागणी गोदापट्ट्यातील गावकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.अवैध वाळू उपशावर प्रशासन कारवाई करणार की नेहमीप्रमाणे डोळेझाक करणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
चौकट ….  गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपसा; लाखो रुपयांचा महसूल पाण्यात
गेवराई तालुक्यातील गोदापट्ट्यात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गुंतेगाव येथे अधिकृतपणे एकच वाळू टेंडर असताना बोरगाव, गुळज, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळस पिंपळगाव, सावळेश्वर, सावरगाव तसेच तलवाडा मंडळातील अनेक गावांमध्ये रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. या अवैध वाळू उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल पाण्यात जात असून प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा गोदापट्ट्यातील नागरिकांत रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून शेकडो ट्रॅक्टर आणि डंपरमधून वाळूची ने-आण सुरू आहे. मात्र महसूल विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने वाळू माफियांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट : मंडळ अधिकाऱ्यांना माफियांचा “प्रसाद”?
गेवराई तालुक्यात वाळू माफियांचा नंगानाच सुरू असल्याचा आरोप होत असून तहसीलदाराच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे एका महिन्यात दोन वेळा मंडळ अधिकाऱ्यांना माफियांनी मारहाण करून “प्रसाद” दिल्याची घटना घडल्याची चर्चा आहे. गेवराई व चकलांबा हद्दीत घडलेल्या या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र तलवाडा मंडळातील घटनेबाबत अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित मंडळ
अधिकारी, तलाठी व तहसीलदारांवर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे.
Back to top button