बीड
अण्णा हजारे व खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात भटक्या विमुक्त समाजावर अन्याय?

अण्णा हजारे व खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात भटक्या विमुक्त समाजावर अन्याय?
ग्रामसभेच्या ठरावातून मदारी समाजातील १५ कुटुंब बेघर करण्याचा निर्णय; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
अहिल्यानगर (प्रतिनिधी) –ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील निघोज (ता. पारनेर) येथे मागील तीन दशकांपासून वास्तव्यास असलेल्या मदारी समाजाच्या १५ कुटुंबांना ग्रामसभेच्या ठरावाद्वारे बेघर केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
या निदर्शनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अँड. डॉ. अरुण जाधव, राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख, युवक नेते योगेश गुंजाळ, विजय काळे, तसेच पीडित मदारी समाजातील सलीम, उस्मान, चिराग, बशीर, नसीर, राजू, बरकत मदारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मदारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सापांचे खेळ, जादूचे प्रयोग व जुन्या कपड्यांची विक्री असून, आजपर्यंत त्यांच्या समाजावर कुठलाही गुन्हा नोंदलेला नाही. मात्र जादूटोणा विरोधी कायदा व वनखात्याच्या अडचणींमुळे त्यांचा पारंपरिक व्यवसाय बंद झाला असून, सध्या ते भंगार गोळा करणे व लहानमोठ्या वस्तू विकून उपजीविका चालवत आहेत.
महाराष्ट्र शासनाची अंदाजे चार ते पाच एकर पुनर्वसन जमीन निघोज येथे असून, त्याच जागेवर हे कुटुंबीय झोपड्या करून राहत होते. मात्र शेजारील निलेश भुकन या व्यक्तीने त्यांना वारंवार धमकी दिली. जुलै महिन्यात भुकन याने मदारी समाजाच्या मालकीची शेळी विकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याच व्यक्तीच्या गोठ्याला लागलेल्या आगीत मदारी समाजाचा कोणताही संबंध नसताना त्यांच्या विरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल करण्यात आली व गावात ग्रामसभा घेऊन समाजाला हाकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे, अण्णा हजारे व खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील या घटनेमुळे भटक्या विमुक्त समाजावरील अन्यायाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
निवेदनात हेही नमूद करण्यात आले आहे की, निघोज गावातील इतर कोणत्याही नागरिकाशी त्यांचा वाद नाही. एकट्या निलेश भुकनच्या कुरापतीखोर वृत्तीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या प्रकरणाची सखोल व गोपनीय चौकशी करून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.



