बीड

गणपतीपुळे दुर्घटनेतील मृत तरुणांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत द्या

गणपतीपुळे दुर्घटनेतील मृत तरुणांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत द्या
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मनोज पेरे पाटील यांची मागणी
पैठण | किरण काळे
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी २० जून २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बिडकीन येथील पाच होतकरू तरुणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना (उबाठा) गटनेते मनोज नंदकिशोर पेरे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे निवेदन सादर करून राज्य शासनाकडे तातडीने शिफारस करण्याची विनंती केली.
सभेत बोलताना पेरे पाटील यांनी सांगितले की, गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून यश रामेश्वर कांबळे, आनंद राजू नरवडे, आदित्य संतोष राऊत, अनिकेत बंडू हिवराळे आणि प्रेम दीपक आदमाने या पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बिडकीन परिसर शोकमग्न झाला असून संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत्यूमुखी पडलेले अनेक तरुण आपल्या कुटुंबांचे कर्ते सदस्य होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकट ओढवले आहे.अशा परिस्थितीत शासनाने मानवीय दृष्टिकोनातून तातडीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
पेरे पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या तरतुदींचा उल्लेख करत सांगितले की, मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या उद्दिष्टांनुसार मोटार, रेल्वे, विमान किंवा जहाज अपघात वगळता इतर अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. गणपतीपुळे येथील समुद्र दुर्घटना ही विशेष बाब मानून मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यासाठी राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेमार्फत भक्कम शिफारस करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल तातडीने शासनाकडे पाठवून मदतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.या आर्थिक सहाय्यामुळे शोकाकुल कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळेल आणि जिल्हा परिषद त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वास निर्माण होईल, असेही पेरे पाटील यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित सदस्यांनीही या मागणीची दखल घेत पीडित कुटुंबांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. गणपतीपुळे दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना न्याय मिळावा आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.
………………………………………………
 “गणपतीपुळे समुद्र दुर्घटनेत बिडकीन येथील पाच होतकरू तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या कुटुंबांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे.शासनाने मानवीय दृष्टिकोनातून या प्रकरणाची विशेष बाब म्हणून दखल घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक पीडित कुटुंबाला किमान पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने मंजूर करावी. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत राज्य शासनाकडे भक्कम शिफारस करण्यात यावी, हीच आमची मागणी आहे.”
– मनोज नंदकिशोर पेरे पाटील
जिल्हा परिषद सदस्य, बिडकीन गट तथा गटनेता, शिवसेना (उबाठा)

Back to top button