बीड

धारवली गावात वर्ष श्राद्धानिमित्त अनोखा उपक्रम; तांदळेकर बंधूंकडून होळीवर दोन पार बांधण्याचा शुभारंभ!

धारवली गावात वर्ष श्राद्धानिमित्त अनोखा उपक्रम; तांदळेकर बंधूंकडून होळीवर दोन पार बांधण्याचा शुभारंभ!
​श्रीवर्धन (विशेष प्रतिनिधी):
श्रीवर्धन तालुक्यातील धारवली गावामध्ये सामाजिक बांधीलकी आणि पितृस्मरण यांचा एक आदर्श मेळ पाहायला मिळाला. कैलासवासी सखाराम तांदळेकर यांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र श्री. सुनील सखाराम तांदळेकर आणि सुजितभाई सखाराम तांदळेकर यांच्या वतीने गावातील होळीच्या जागेवर दोन भव्य पार (ओटे) बांधण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या लोकउपयोगी कामाचा शुभारंभ नुकताच स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर बांधवांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.
​आपल्या पूर्वजांच्या स्मृती केवळ धार्मिक विधींपुरत्या मर्यादित न ठेवता, समाजाला आणि गावाला उपयोगी पडेल असे कार्य उभे करावे, या उद्देशाने तांदळेकर कुटुंबीयांनी हा स्तुत्य निर्णय घेतला. गावातील सार्वजनिक उपक्रम, सण-उत्सव आणि ग्रामस्थांना एकत्र बसण्यासाठी हक्काची जागा मिळावी म्हणून होळीवर हे दोन पार बांधण्यात येणार आहेत.
​या शुभारंभ प्रसंगी धारवली गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झालेले पण गावच्या मातीशी नाळ जोडून राहिलेले अनेक मुंबईकर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​वर्षश्राद्धाचे औचित्य साधून तांदळेकर बंधूंनी सामाजिक भान जपत सुरू केलेल्या या विकासकामाचे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात आणि विशेषतः धारवली पंचक्रोशीत भरभरून कौतुक होत आहे. ‘पूर्वजांच्या स्मरणार्थ असे विधायक काम करणे हा समाजासाठी एक उत्तम पायंडा आहे,’ अशा भावना उपस्थित ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केल्या.
Back to top button