बीड
गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांची धडधड वाढली! बीड जिल्ह्यात प्रशासनाची मोठी कारवाई

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांची धडधड वाढली! बीड जिल्ह्यात प्रशासनाची मोठी कारवाई
बीड | प्रतिनिधी
लक्ष्मण घायतिडक
बीड जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती LPG गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक व अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. आघाडीची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता इंधनाबाबत कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पेट्रोल-डिझेल व गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
घरगुती LPG गॅसचा अवैध व व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात १९ विशेष पथके तयार करून तपासणी करण्यात आली. या पथकांनी जिल्हाभर विविध आस्थापनांची पाहणी केली. या तपासणी मोहिमेत २०३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १३ ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर आढळून आला. यावेळी २८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून ३ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व LPG गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.


