बीड
राक्षसभुवन शासकीय विश्रामगृह पडले वाऱ्यावर; देखभालीअभावी वास्तूची दुरवस्था

राक्षसभुवन शासकीय विश्रामगृह पडले वाऱ्यावर; देखभालीअभावी वास्तूची दुरवस्था
गेवराई प्रतिनिधी
ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या राक्षसभुवन शनी क्षेत्रातील शासकीय विश्रामगृह सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरवस्थेत सापडले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही वास्तू देखभाल आणि दुरुस्तीअभावी मोडकळीस आली असून भाविकांच्या गैरसोयीचे कारण ठरत आहे.
राक्षसभुवन येथे शनिदर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यांच्या मुक्काम व सोयीसाठी उभारण्यात आलेले शासकीय विश्रामगृह अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. विश्रामगृह परिसरात सर्वत्र घाण साचलेली असून झाडी-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. इमारतीच्या विविध भागांची झीज झाल्याने वास्तूची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
देखभालीअभावी विश्रामगृहातील मूलभूत सुविधांवरही परिणाम झाला असून येथे येणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या ठिकाणाच्या विकासाकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
शनी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शासकीय विश्रामगृहाची तातडीने दुरुस्ती करून परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करावे, अशी मागणी केली आहे. संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन मोडकळीस आलेल्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करावे, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.



