बीड

‘मृताच्या टाळूवरील लोणी चाटून खाणाऱ्या घराणेशाहीला गरिबांचं दुःख कसं समजणार?’ :

‘मृताच्या टाळूवरील लोणी चाटून खाणाऱ्या घराणेशाहीला गरिबांचं दुःख कसं समजणार?’ :
श्रीवर्धनमध्ये शासकीय विश्रामगृहाशेजारील स्मशानभूमीत मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार; मंत्र्यांच्या मतदारसंघात जनतेचा तीव्र संताप!
​श्रीवर्धन (संदेश घोलप):
​एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या पर्यटन विकासाच्या आणि हायटेक सुविधांच्या मोठमोठ्या बाता मारायच्या, तर दुसरीकडे मात्र जनतेला मूलभूत हक्कांसाठी आणि अंतिम विधीसाठीही अंधारात चाचपडायला लावायचं, हाच श्रीवर्धनमधील सत्ताधाऱ्यांचा खरा कारभार आता समोर आला आहे. श्रीवर्धन शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या मुख्य स्मशानभूमीत वीज पुरवठा नसल्यामुळे एका मृतदेहावर चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली.
​अनेक बड्या मंत्र्यांचा आणि व्ही.आय.पी. नेत्यांचा वावर असलेल्या विश्रामगृहाच्या अगदी शेजारीच असलेल्या या स्मशानभूमीची ही दुरवस्था पाहून स्थानिक नागरिकांमधून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. यावरून, “मृताच्या टाळूवरचं लोणी चाटून खाणाऱ्या घराणेशाहीला गोरगरीब जनतेचं दुःख कसं समजणार?” असा थेट आणि आक्रमक सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
​व्ही.आय.पी. विश्रामगृहाजवळ लखलखाट, स्मशानभूमीत मात्र अंधाराचं साम्राज्य!
​मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धनमधील एका नागरिकाच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक आणि नागरिक शासकीय विश्रामगृहाजवळील मुख्य स्मशानभूमीत पोहोचले. शासकीय विश्रामगृहावर मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी विजेचा लखलखाट असतो, मात्र त्याच्याच शेजारी असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या स्मशानभूमीत मात्र साधी विजेची सोय नसल्याने संपूर्ण अंधार पसरला होता. अखेर संतापलेल्या नागरिकांनी आणि नातेवाईकांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च चालू करून, त्या प्रकाशात अतिशय क्लेशदायक परिस्थितीत अंत्यविधी उरकला.
​ज्या मतदारसंघाचे नेतृत्व थेट महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट पातळीवरील मंत्री करतात, तिथल्या मुख्य शहरातील स्मशानभूमीत साधी लाईट नसावी, यासारखं दुसरं दुर्दैव नाही.
​घराणेशाही आणि असंवेदनशील प्रशासनावर प्रहार
​या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यातून लोकप्रतिनिधींवर आणि नगरपरिषद प्रशासनावर टीका होत आहे. सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या घराणेशाहीला सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याशी काहीही देणंघेणं उरलेलं नाही, हीच भावना या निमित्ताने नागरिकांनी बोलून दाखवली. निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागणारे नेते एरवी मात्र जनतेला वाऱ्यावर सोडून देतात, हीच या मतदारसंघाची शोकांतिका बनली आहे.
​श्रीवर्धनकर जनतेचे थेट सवाल:
​पर्यटन आणि विकासाचे दावे करणाऱ्या मंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील मुख्य स्मशानभूमीत साधा एक विजेचा बल्ब किंवा सौर ऊर्जेवर चालणारा एखादा दिवा बसवता आला नाही का?
​शासकीय विश्रामगृहावर व्ही.आय.पी. नेत्यांसाठी कोट्यवधींचा खर्च करणं सोपं आहे, मग गरिबांच्या हक्काच्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष का?
​या अत्यंत गंभीर आणि असंवेदनशील निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या मुख्याधिकारी आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार का?
​अंधारात झालेल्या या अंत्यविधीच्या घटनेने श्रीवर्धनमधील सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांच्या दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. आता तरी या असंवेदनशील प्रशासनाला जाग येणार की घराणेशाहीच्या अहंकारात हीच अंधाराची परिस्थिती कायम राहणार, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत भगत यांची प्रतिकिया :
​”मंत्र्यांनी लाज बाळगावी, मतं मागताना विकास कुठे गेला?” : (चंद्रकांत भगत -स्थानिक नागरिक)
​या संतापजनक प्रकारावर श्रीवर्धनचे स्थानिक नागरिक चंद्रकांत भगत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रशासनाचा आणि मंत्र्यांचा निषेध केला आहे. ते म्हणाले:
“शासन आणि प्रशासन नेमकं करतंय काय? मंत्र्यांचे दौरे असले की याच विश्रामगृहावर रात्रीचा दिवस केला जातो, लखलखाट केला जातो. मग त्याच्याच शेजारी असलेल्या स्मशानभूमीत सर्वसामान्यांच्या अंत्यविधीसाठी लाईट का नाही? माणसाला मरताना तरी शांतता आणि सन्मान मिळावा की नाही? निवडणुका आल्या की हेच घराणेशाहीचे नेते गल्लोगल्ली मटण आणि पैशांची पाकीटं वाटत फिरतात, मग स्मशानभूमीत साधा एक जनरेटर किंवा विजेचा बल्ब लावताना यांची बोटं का मोडतात? मंत्र्यांनी आणि नगरपालिकेने आता तरी लाज बाळगावी. सामान्य जनतेच्या पैशांवर सत्तेची मलाई खाणाऱ्यांना गरिबांच्या या मरणाळू यातना कधीच समजणार नाहीत. जोपर्यंत इथे कायमस्वरूपी विजेची सोय होत नाही, तोपर्यंत आम्ही लोकप्रतिनिधींना जाब विचारत राहू!”

Back to top button