बीड
नवेगाव बु. येथे श्रमदानातून घडले स्वच्छतेचे पर्व; एकजुटीने साकारला आदर्श ग्रामविकासाचा संकल्प

नवेगाव बु. येथे श्रमदानातून घडले स्वच्छतेचे पर्व; एकजुटीने साकारला आदर्श ग्रामविकासाचा संकल्प
दै, सूर्योदय:-निश्चल येनोरकर
नवेगाव बु:- स्वच्छता ही केवळ मोहिम न राहता ती एक चळवळ व्हावी, या भावनेतून नवेगाव बु. येथे भव्य आणि प्रेरणादायी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाने संपूर्ण गावात नवचैतन्य निर्माण झाले असून, श्रमदानाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी नवेगाव बु. घडवण्याचा निर्धार कृतीतून दाखवून दिला.
या ग्राम स्वच्छता अभियानास तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चिंतामण तिबूडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत गावातील सर्व स्तरांतील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चिंतामण तिबुडे व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळच्या पहाटेपासूनच हातात झाडू, फावडे, घमेले घेत गावकऱ्यांनी संपूर्ण गाव स्वच्छतेच्या कार्यात झोकून दिले.
गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत गल्लीबोळ, सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या जागा, गटारे व पाणवठे यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. अनेक दिवस साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ व टवटवीत करण्यात आला. या उपक्रमामुळे केवळ गावाचे रूपच बदलले नाही, तर नागरिकांच्या मानसिकतेतही सकारात्मक परिवर्तन घडून आले.
या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेसोबतच आरोग्याचे महत्त्व, स्वच्छ वातावरणाचे फायदे, तसेच सार्वजनिक मालमत्तेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. विशेषतः युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांची कामातील तत्परता ही या मोहिमेची खरी ताकद ठरली.
“माझे गाव,माझी जबाबदारी” हा विचार नवेगाव बु. मध्ये केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे चित्र दिसून आले. या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेविषयी जनजागृती वाढली असून भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला.
नवेगाव बु. येथील ग्राम स्वच्छता अभियान हे इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामविकासाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल नक्कीच आदर्श ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.



