वारकरी संप्रदायात जात-धर्मापेक्षा ’भाविक भक्त’ म्हणून प्राधान्य : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सिताराम गडाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही
खर्डा दि.15(प्रतिनिधी): वारकरी संप्रदायात श्रद्धेला अत्यंत महत्त्व असून या संप्रदायात जात किंवा धर्म यापेक्षा प्रत्येकाकडे केवळ एक ’भाविक भक्त’ म्हणून बघितले जाते. याच भक्तीभावाने दरवर्षी लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात आणि पांडुरंगाचे मुखदर्शन घेऊन वर्षभर त्याचे चिंतन करतात. खर्या अर्थाने सुख आणि समाधान जर कुठे असेल तर ते नामस्मरणात आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
संत सितारामबाबा यांच्या तपोपूर्ती पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी गडावर आल्यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी वारकरी संप्रदायाची महती विशद केली. अठरा पगड जातीचे लोक वारीत सहभागी होतात. तिथे कोणताही भेदभाव नसतो असे ते म्हणाले. तसेच सिताराम गडाच्या विकासासाठी जे जे करता येईल ते नक्की करू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी उपस्थित भाविकांना दिली.
याप्रसंगी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते भागवत ग्रंथाची आरती करण्यात आली. या सोहळ्याला मठाधिपती ह.भ.प. महंत महालिंग महाराज, यांच्यासह भागवत कथाकार ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील, ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे, नरहरी महाराज पवार, नाना महाराज कदम, हरीदास महाराज, दूध संघाचे अध्यक्ष विलास बडगे, नवनाथ कुलकर्णी, डॉ.महेश गोलेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या धार्मिक सोहळ्यासाठी खर्डा व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



