बीड
श्रीवर्धनमध्ये चोरांचा तांडव; पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारांचे खुले आव्हान, आता नागरिकांचा ‘ड्रोन’ प्रहार!

श्रीवर्धनमध्ये चोरांचा तांडव; पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारांचे खुले आव्हान, आता नागरिकांचा ‘ड्रोन’ प्रहार!
– विठ्ठल आळी, साळीवाडा हादरले; हातात लोखंडी सळ्या घेऊन चोरट्यांची भरवस्तीत दहशत
– हतबल पोलीस यंत्रणेसमोर संतापलेल्या श्रीवर्धनकरांचा एल्गार; चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुकारले ‘ड्रोन युद्ध’
श्रीवर्धन (संदेश घोलप) शांत आणि निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन शहराला सध्या चोरांच्या टोळीने वेढले असून, सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांनी अक्षरशः कहर केला असून, हे चोरटे आता केवळ घराबाहेरच नाहीत, तर थेट घरांचे दरवाजे ठोठावून पोलिसांच्या कार्यक्षमतेला उघड आव्हान देऊ लागले आहेत. या वाढत्या ‘जंगलराज’मुळे संतापलेल्या श्रीवर्धनकरांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, डोंगरदऱ्यांत लपलेल्या या चोरांचा शोध घेण्यासाठी चक्क ‘ड्रोन’च्या साहाय्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याची तयारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ११) मध्यरात्री विठ्ठल आळी आणि बंदर गोठण परिसरात या टोळीने धुमाकूळ घातला. हातात लोखंडी सळ्या आणि धारदार शस्त्रे घेऊन हे गुंड भरवस्तीत शिरले. त्यांनी चक्क रहिवाशांच्या घराचे दरवाजे जोराने ठोठावून भीतीचे वातावरण निर्माण केले. मात्र, श्रीवर्धनच्या जागरूक नागरिकांनी वेळीच सतर्क होत आरडाओरडा केल्यामुळे, पकडले जाण्याच्या भीतीने या चोरांनी अंधाराचा फायदा घेत जवळच असलेल्या डोंगराच्या दिशेने पळ काढला. यापूर्वी सुरेश कर्णेकर यांच्या घरावर दरोडा टाकून चोरांनी दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती, ज्याचा तपास अद्यापही प्रलंबित आहे.
नगरपरिषदेचे ‘सीसीटीव्ही’ शोभेच्या बाहुल्या?
शहराच्या सुरक्षिततेसाठी लाखो रुपये खर्चून बसवण्यात आलेले नगरपरिषदेचे सीसीटीव्ही कॅमेरे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पंधरा कॅमेऱ्यांपैकी अनेक कॅमेरे नादुरुस्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे नगरपरिषद फुटेज दिल्याचे सांगत असली, तरी प्रत्यक्ष गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात हे कॅमेरे कुचकामी ठरत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या मनातही या यंत्रणेबाबत साशंकता असल्याने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आता आकाशातून होणार चोरांची शिकार!
चोरटे चोरी केल्यानंतर थेट दुर्गम डोंगराळ भागात आश्रय घेत असल्याचा नागरिकांचा ठाम दावा आहे. हा भाग घनदाट असल्याने पोलिसांना तिथे शोध घेताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे, आता नागरिकांनीच पुढाकार घेऊन ‘नॅनो ड्रोन’च्या साहाय्याने चोरांचा शोध घेण्याची मागणी लावून धरली. परिस्थितीची दाहकता ओळखून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरद यांनी तातडीने ड्रोन वापरण्याची परवानगी दिली आहे. आता आकाशातून चोरांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली जाणार असून, डोंगरदऱ्यात लपलेल्या गुन्हेगारांना हुडकून काढले जाणार आहे.
नागरिकांचा सवाल: पोलीस फक्त रात्रगस्तच करणार का?
“केवळ आश्वासन नको, तर चोरांच्या मुसक्या आवळा!” अशा संतप्त भावना नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन व्यक्त केल्या. पोलीस रात्रगस्त (Patrolling) वाढवल्याचा दावा करत असले, तरी चोरांमध्ये पोलिसांचा धाक उरलेला नाही, हेच या घटनांवरून स्पष्ट होत आहे. साळीवाडा येथील चाळीत झालेल्या चोरीपासून सुरू झालेले हे सत्र अद्याप थांबलेले नाही. आता ड्रोन आणि वाढीव बंदोबस्तामुळे तरी श्रीवर्धनला या भीतीदायक सावटातून मुक्ती मिळणार का? हाच मोठा प्रश्न आहे.
“आम्ही आता गप्प बसणार नाही. जर पोलीस यंत्रणा हतबल ठरत असेल, तर आम्ही तंत्रज्ञानाच्या जोरावर चोरांना डोंगरातून खेचून बाहेर काढू. श्रीवर्धनची शांतता भंग करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय नागरिक स्वस्थ बसणार नाहीत.”
-एक संतप्त नागरिक, श्रीवर्धन.


