बीड

तुमसर पोलिसांचा अवैध धंद्यांवर करारी प्रहार; कोंबिंग ऑपरेशनमध्ये ७ लाख १२ हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

तुमसर पोलिसांचा अवैध धंद्यांवर करारी प्रहार; कोंबिंग ऑपरेशनमध्ये ७ लाख १२ हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त
रेतीची अवैध वाहतूक, प्रतिबंधित सुगंधी तंबाख्याचा साठा आणि हातभट्टी मोहफुलाच्या दारूवर सलग धडक कारवाया; तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
तुमसर, :- अवैध धंद्यांविरोधात तुमसर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनदरम्यान जोरदार मोहीम राबवत रेतीची अवैध वाहतूक, प्रतिबंधित सुगंधी तंबाख्याचा साठा आणि हातभट्टी मोहफुलाच्या दारूच्या विक्रीवर सलग धडक कारवाया केल्या. या संयुक्त कारवाईत एकूण ७ लाख १२ हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कारवाईतील सर्वात मोठ्या प्रकरणात बोरी येथील चक्रधर कैलास परसमोडे (वय २०) हा ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळला. त्याच्याकडून एमएच-३६-एआर-५८४७ क्रमांकाचा स्वराज ट्रॅक्टर, एमएच-३६-एएल-९७०६ क्रमांकाची ट्रॉली आणि सुमारे एक ब्रास रेती असा ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत तामसवाडी (भेद्रे) येथील आशिष केशवराव डबले (वय ३५) यांच्या घरावर छापा टाकून रिमझीम, आर गोल्ड, इगल हुक्का शिशा आणि सुप्रीम पान पराग यांसह ४ हजार ९८५ रुपयांचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखा व पानमसाल्याचा साठा ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
तिसऱ्या कारवाईत नेहरू वॉर्ड येथील गीता सुरेश गुर्वे (वय ६५) यांच्या ताब्यात विक्रीसाठी ठेवलेली १० लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून सुमारे २ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, पोलीस उपनिरीक्षक प्रितम येवले, पोलीस उपनिरीक्षक मनोहर शहारे तसेच डी.बी. पथक आणि तुमसर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली. पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Back to top button