बीड

भ्रष्टाचाराचा खरा ‘शार्क मासा’ अजूनही मोकाट – आमदार रोहित पवार

भ्रष्टाचाराचा खरा ‘शार्क मासा’ अजूनही मोकाट – आमदार रोहित पवार

नगर परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची ‘बुलेट’ लाइफस्टाईल!

जामखेड : जामखेड नगर परिषदेत भ्रष्टाचाराची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की, आता पुढाऱ्यांपेक्षाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे राहणीमान अधिक ऐशआरामाचे झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. अल्प पगारातही बुलेटसारख्या महागड्या गाड्या, आलिशान जीवनशैली आणि अचानक वाढलेली संपत्ती यामुळे संशय अधिकच गडद होत आहे.

सामान्य नागरिकांचे लहानसहान कामे प्रलंबित ठेवून ‘हात गरम’ केल्याशिवाय फाईल हलत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आरोप होत आहेत. इतकेच नव्हे तर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुणे येथे फ्लॅट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत ही संपत्ती संशयास्पद वाटत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जामखेड नगर परिषदेतील कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दरम्यान, नुकत्याच उघडकीस आलेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे. मुलगा व मुलीच्या जन्म दाखल्यासाठी तब्बल तीन हजार रुपयांची लाच घेताना जामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कागदावर जन्माची नोंद, पण हातात लाचेची देवाणघेवाण या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.जनतेच्या पैशावर चालणारी यंत्रणा, आता जनतेलाच लुटून ऐश करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. जन्म दाखल्यासारख्या मूलभूत कामासाठीही लाच मागितली जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?
———————-
चौकट :

जन्म दाखल्यासाठी लाच घेताना दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, पण हे केवळ भ्रष्ट व्यवस्थेतील ‘चिंगळ्या’ आहेत. नगरपरिषदेतील भ्रष्टाचाराचा खरा ‘शार्क मासा’ अजूनही मोकाट फिरत असून, त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय जामखेडकरांना दिलासा मिळणार नाही, अशी घणाघाती टीका आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पेज वरून ट्विट केले आहे केले.

Back to top button