बीड
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे बोर्ड शासनाची दिशाभूल करणारे; अभियंता यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष ग्रामस्थांच्या मुळावर :- डॉ. गणेश ढवळे

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांचे बोर्ड शासनाची दिशाभूल करणारे; अभियंता यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष ग्रामस्थांच्या मुळावर :- डॉ. गणेश ढवळे
—
बीड :- (दि.१२) मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांची पारदर्शकता आणि दर्जा राखण्यासाठी शासनाने ठरवलेल्या नियमांनुसार माहितीफलकावर योजनेचे नाव, कामाचा प्रकार (नवीन रस्ता की सुधारणा), रस्ता कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो, कामाची अंदाजित किंमत, निधी देणारी संस्था (महाराष्ट्र शासन), कामाची सुरुवात आणि पूर्ण होण्याची तारीख, तसेच संबंधित अभियंता व कंत्राटदारांची माहिती नमूद करणे बंधनकारक असते.
यामुळे ग्रामस्थांना रस्त्याच्या देखभाल कालावधीबाबत आणि कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट माहिती मिळते. परंतु बीड जिल्ह्यात या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या अनेक रस्त्यांवर माहितीफलकावरील दिनांक आणि वास्तव कामामध्ये तफावत दिसते.
काही ठिकाणी काम सुरू झाल्याची तारीख दोन वर्षांपूर्वीची आणि पूर्ण झाल्याची तारीख वर्षभरापूर्वीची दाखवण्यात आली आहे, तर प्रत्यक्षात सध्या त्या रस्त्यांचे काम सुरू आहे. अशा प्रकारे दुरुस्ती कालावधीत दोन वर्षांचा फरक निर्माण करून कंत्राटदार व अभियंते रस्त्याची जबाबदारी टाळतात.
रस्ता खराब झाल्यानंतर ग्रामस्थ दुरुस्तीची मागणी करतात तेव्हा कंत्राटदार म्हणतात — “दुरुस्ती कालावधी संपला आहे, आता जबाबदारी प्रशासनाची आहे.” त्यामुळे शासन आणि ग्रामस्थ दोघांचीही दिशाभूल होते.
या प्रकारांबाबत सामाजिक कार्यकर्ते तसेच मुख्य प्रचार प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य
डॉ. गणेश ढवळे यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लक्ष वेधून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रस्ता सुरू असतानाच कामाची गुणवत्ता तपासा – डॉ. गणेश ढवळे
ग्रामस्थांनी ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. या योजनेचा उद्देश दुर्गम वाड्या-वस्त्यांना जोडणे आणि विद्यमान रस्त्यांची दर्जोन्नती करणे हा आहे.
रस्ते नसल्याने अनेक गावांतील विद्यार्थी, विशेषतः मुली, शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून रस्त्याचे काम सुरू असतानाच अंदाजपत्रकाप्रमाणे आणि दर्जेदार काम होणे याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.
रस्ता खराब झाल्यानंतर तक्रारी करण्यापेक्षा, काम सुरू असतानाच ग्रामस्थांनी सजग नागरिक म्हणून गुणवत्ता नियंत्रणात सहभाग घ्यावा, असा संदेश त्यांनी दिला आहे.


