बीड
जिल्हा परिषदेच्या धोकादायक व मोडकळीस आलेल्या शाळांना निधी न दिल्यास पालकमंत्री अजितदादांचा ताफा अडवणार –:- डॉ. गणेश ढवळे

जिल्हा परिषदेच्या धोकादायक व मोडकळीस आलेल्या शाळांना निधी न दिल्यास पालकमंत्री अजितदादांचा ताफा अडवणार –:- डॉ. गणेश ढवळे
—-
बीड:-( दि.११) गोरगरिबांच्या शिक्षणासाठी जीवनदायी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या व जीर्णावस्थेत असलेल्या शाळांची दुरवस्था झाली आहे. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करत आहेत. शाळेच्या छताचा भाग अंगावर कोसळुन विद्यार्थी जखमी झाल्याच्या तसेच शाळेच्या भिंती कोसळल्याच्या घटना गेल्या महिनाभरापासून घडत आहेत.जिल्ह्यातील तब्बल ९४ शाळांना इमारत नाही, तर ३८१ शाळांतील ६०७ वर्ग खोल्यांना तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. यासाठी शिक्षण विभागाने १४ कोटी ८५ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केला आहे.
यासंदर्भात डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) व सहकाऱ्यांनी वारंवार निवेदने, आंदोलने करूनही अद्याप निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांना गेल्या ८ महिन्यांत अनेकदा निवेदने देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने, अखेर येत्या मराठवाडा मुक्ती दिनी बीड दौऱ्यावर येणाऱ्या अजितदादा पवार यांच्या ताफ्याला अडवण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या संदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त यांनाही ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.
—
“शाळांच्या दुरावस्थेबाबत अजितदादांना गांभीर्य नाही” – डॉ. गणेश ढवळे
गेल्या ८ महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीनवेळा लक्ष्यवेधी आंदोलने झाली. अगदी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अजितदादांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिल्यानंतर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होईल या कारणास्तव आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते.
या घटनांवरून स्पष्ट होते की, पालकमंत्री अजितदादा पवार यांना गोरगरिबांच्या शिक्षणासाठी जीवनदायी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरावस्थेबाबत कोणतेही गांभीर्य नाही, असा आरोप डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.



