बीड

अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य ; जामखेड येथे मराठा बांधवांचा फटाके फोडून जल्लोष

अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य ; जामखेड येथे मराठा बांधवांचा फटाके फोडून जल्लोष
 सरकारच्या निर्णयाचे स्वागत, जामखेड बंद मागे
जामखेड प्रतिनिधी – संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला अखेर मोठे यश मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते आझाद मैदान, मुंबई येथे पाच दिवसांपासून उपोषणास बसले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आझाद मैदानावर भेट देऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. यात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आदींचा समावेश होता. सरकारने तयार केलेला मसुदा जरांगे पाटील यांना दाखवून त्यांची मुख्य मागणी असलेल्या हैदराबाद गॅझेटनुसार अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली.
या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. यानिमित्ताने जामखेड शहरातील खर्डा चौकात सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने जमले. त्यांनी फटाके फोडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘‘एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ’’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान, मागण्यांना सरकारची मान्यता मिळाल्याने  सकल मराठा समाजाने जाहीर केलेला जामखेड बंद मागे घेण्यात आला आहे. व्यापारी व व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडी ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले. मराठा बांधवांनी एकमताने ‘‘जोपर्यंत जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत’’ अशी भूमिका मांडली.
Back to top button