बीड

बिंदुसरा धरणावर धोकादायक पर्यटन आणि फोटोसेशन; प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करावी – डॉ.गणेश ढवळे

बिंदुसरा धरणावर धोकादायक पर्यटन आणि फोटोसेशन; प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करावी – डॉ.गणेश ढवळे
—-
बीड :-  (दि.२):मुसळधार पावसामुळे पाली येथील बिंदुसरा धरण भरून वाहू लागल्याने हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, येथे वाढणारी गर्दी, पर्यटकांची हुल्लडबाजी आणि धोकादायक फोटोसेशनमुळे धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे
लहान मुले, तरुण मंडळी धरणाच्या पाण्यात व सांडव्यापाशी जात असल्याचे, आंघोळ व फोटोसेशन करत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा प्रकारामुळे कुठल्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरक्षा अभावामुळे धोका:
धरण परिसरात कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही. पूर्वीही धरणाच्या सांडव्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे हा परिसर अत्यंत संवेदनशील असून तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत.
प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत – डॉ.ढवळे:
या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक, सुचना फलकांची स्थापना, प्रवेशद्वारावर नियंत्रण, तसेच पाण्यात जाण्यास प्रतिबंधक बंधारे उभारणे यासारखी पावले उचलणे अत्यावश्यक आहे.
“धरण परिसर पर्यटनासाठी आकर्षक असला तरी जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर सुरक्षा व्यवस्था उभी करावी,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेश) यांनी केली आहे.
Back to top button