बीड
परिवर्तनवादी चळवळीला बळ देणारी संघटना-मराठा सेवा संघ

परिवर्तनवादी चळवळीला बळ देणारी संघटना-मराठा सेवा संघ
मराठा समाजातील मोजक्या समविचारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन क्रांतिपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी ०१ सप्टेंबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना केली. काही मोजके अपवाद सोडले तर मराठा समाजाची तात्कालीन परिस्थिती बिकट आणि दयनीय होती. समाज विखुरलेला होता, समाजात अनेक पोटभेद होते. अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यामध्ये अडकलेला होता. श्रीमंतीचे अनाठायी प्रदर्शन, अंधश्रद्धा – कर्मकांड, व्यसनाधीनता, गरज नसताना उधळपट्टी, चंगळवाद, यामुळे समाज कर्जबाजारी होत होता. महिलांमधील उपवास – तापास, व्रतवैकल्ये, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि पुरुषांमधील व्यसनाधीनता व भावभावकीची भांडणे, ऋण काढून सण साजरे करणे या सगळ्या गोष्टींमुळे बहुसंख्य मराठा समाजाची आर्थिक स्थिती तेव्हाही हलाखीचीच होती आणि आताही हलाखीचीच आहे. समाजात मोठ्या प्रमाणात शिक्षणाविषयी अनास्था होती. या सगळ्या कारणांनी बहुसंख्य मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास कधी झाला हे त्याच्याही लक्षात आले नाही. या सर्व विस्थापित, विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र केल्यास, समाजाचे प्रबोधन केल्यास, समाजाला परिवर्तनाच्या मार्गावर आणल्यास वंचित, शोषित, पीडित मराठा समाजाच्या विकासाला चालना मिळू शकते आणि या समाजाला चांगले दिवस येऊ शकतात असा सशक्त विचार खेडेकर साहेबांच्या डोक्यात जन्मला. त्यांनी तो समाजमनात रुजवला, वाढवला तो केवळ आणि केवळ समाजाप्रती असलेल्या कळवळ्यापोटी
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥ध्रु.॥
या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संत वचनाप्रमाणेआईच्या मनात ज्याप्रमाणे आपल्या मुलाच्या हिताचा विचार असतो तसाच मराठा सेवा संघाच्या मागील ३५ वर्षाच्या वाटचालीमध्ये फक्त आणि फक्त समाजाच्या हिताचाच विचार आहे. समाज हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी संघटना अशी मराठा सेवा संघाची ओळख आहे. कोणत्याही परिवर्तनवादी चळवळीचे व्यापक मानव कल्याण हेच अंतिम उद्दिष्ट असायला हवे आणि याच उद्दिष्टाला अनुसरून मराठा सेवा संघाने ३५ वर्ष काम केले आहे आणि आजही करत आहे.
मराठा सेवा संघाने समाजाला चाकोरीबद्ध जीवन मार्गावरून परिवर्तनाच्या नव्या जीवन मार्गावर आणले. परिवर्तनासाठी समाजाचे प्रबोधन केले. परिवर्तनशील जीवनाला सतत नाविन्याचा ध्यास असतो. ते नवनवीन संकल्पना, विचार, तत्वज्ञान यामुळे उन्नत होत जाते. याची जाणीव समाजाला करून दिली. स्थित्यंतराशिवाय गत्यंतर नाही आणि परिवर्तनाशिवाय जीवनात आनंद नाही, प्रगती नाही हे सांगणारी संघटना आणि नेतृत्व मराठा सेवा संघामुळे समाजाला मिळाले. त्यामुळे मराठा बहुजन समाजाला वैचारिक दिशा मिळाली आणि परिवर्तनाला गती मिळाली हे मराठा सेवा संघाचे यश आहे.
बेरोजगार मराठा तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. कुठलाही व्यवसाय हलका किंवा भारी नसतो त्यामुळे डोक्याच्या मालिशपासून ते बूट पॉलिशपर्यंत कुठलाही व्यवसाय करा आणि स्वाभिमानाने जगा हा मंत्र तरुणांना मराठा सेवा संघाने दिला. ज्या तरुणांच्या हातामध्ये दगड, लाठ्या, काठ्या आणि शस्त्र दिले जायचे व दंगली घडवल्या जायच्या, तरुणांना गुन्हेगार बनवून समाज विघातक कृत्य त्यांच्याकडून करून घेतल्या जायची त्या तरुणांच्या हातामध्ये वही, पुस्तक आणि लेखणी देऊन त्यांना रचनात्मक व सृजनशील मार्गावर आणून त्यांचे जीवन समृद्ध करणारी, त्यांच्यामध्ये कुटुंब, समाज व राष्ट्राप्रतीच्या जबाबदारीचे आत्मभान जागृत करणारी, तरुणांचे प्रबोधन करून त्यांच्या माध्यमातून केडरबेस विचारांचे इतिहास लेखक, अभ्यासक , संशोधक, प्रकाशक, वक्ते, कार्यकर्ते, शाहीर, कीर्तनकार, विचारवंत, कलागुणसंपन्न कलाकार, व्यापारी , उद्योजक, अधिकारी, कर्मचारी निर्माण करण्याचं काम मराठा सेवा संघाने केले. त्याचबरोबर धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षणसत्ता, प्रचार – प्रसार माध्यम सत्ता प्राप्त केल्याशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे. या पाच सत्ता ताब्यात घेण्याचं स्वप्न मराठा बहुजन समाजाच्या मेंदूमध्ये पेरण्याचं काम मराठा सेवा संघाने केलं आणि त्या क्षमता विकसित करण्यासाठी मराठा सेवा संघाने ३५ वर्ष प्रयत्न केले. मराठा सेवा संघाने जंगम संपत्तीपेक्षा बौद्धिक संपत्ती विकसित करण्यावर भर दिला आणि आज बौद्धिक संपत्तीने मराठा सेवा संघ ही संघटना सर्वात श्रीमंत संघटना आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
मराठामार्ग मासिक व शिवधर्म साप्ताहिकाने समाजमनाची मशागत केली. त्यासोबतच इतिहासाला लागलेले डाग पूसून काढले. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांसह मराठा बहुजन समाजातील कर्तबगार महामानवांचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहचवला. खोट्या इतिहासाच्या माध्यमातून चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून प्रतिमा मलीन करण्याचा व लोकांचा बुद्धिभेद करण्याचा जो प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होता त्याला पायबंद घालण्याचे काम मराठा सेवा संघाने केले. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास समाजासमोर आणून तो तळागाळापर्यंत पोहोचवला. अनेक नाटक, चित्रपट, कथा, कादंबऱ्या, मालिका या माध्यमातून इतिहासाला डाग लावण्याचं काम मागील अनेक वर्षात झालं होता. ते डाग संशोधनातून सप्रमाण पुसून टाकण्याचे काम मराठा सेवा संघाने केले.
मराठा सेवा संघामुळे जातीय आणि धार्मिक दंगली जवळजवळ बंद झाल्या. धर्मा–धर्मामध्ये, जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करून दंगली घडवणाऱ्या वृत्तीला चाप बसला. त्यामुळे महाराष्ट्राच्या भाळी लागलेला दंगलीचा कलंक पुसला गेला. छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करत होते. शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचे योगदान होते हे लोकांच्या लक्षात आले त्यामुळे शिवराय सर्वांचे आणि सर्व जाती धर्माचे लोक शिवरायांचे हा विचार समाज मनात रुजला. मुस्लिमांना देखील शिवराय आपले वाटायला लागले हे मराठा सेवा संघाच्या प्रबोधनाचे यश आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे व सर्वच वारकरी संत यांचे विचार प्रत्येक घरापर्यंत व घरातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले. फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमा मराठा समाजाच्या घरापर्यंत आणि विचार मेंदूपर्यंत पोहोचले. त्याचप्रमाणे शिवरायांच्या प्रतिमा आणि त्यांचे विचार इतर जात धर्म समूहांच्या घरापर्यंत पोहोचले. वारकरी संत आणि महामानवांची मर्यादित आणि चुकीची ओळख पूसल्या गेली व खरेखुरे सर्वांना सोबत घेऊन चालणारे त्यांचे विचार आणि कार्य जनतेपर्यंत पोहोचले. सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या लक्षात आले की आपला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा एक आहे. आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहू शकतो. परस्पर सहकार्य व सामंजस्याने शांततामय जीवन जगू शकतो प्रगती करू शकतो. सर्व जाती धर्मातील समविचारी परिवर्तनवादी चळवबळींमध्ये व त्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुसूत्रता आणण्याचे, सर्वांना एका विचारपीठावर आणण्याचे काम मराठा सेवा संघाने केले. त्यामुळे मराठा सेवा संघ सर्वांना आपलासा वाटतो, जवळचा वाटतो.
मराठा सेवा संघ ही जगातली एकमेव संघटना आहे जी एका कर्तबगार स्त्रीच्या नावाने अभिवादन करते. जिजाऊंना प्रेरणा, ऊर्जा आणि शक्ती मानते. त्याचबरोबर जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाई यांसह बहुजन समाजातील कर्तबगार स्त्रीशक्तीचा इतिहास समाजापर्यंत, महिला, मुलींपर्यंत पोहोचवला. त्यामुळे महिला मुली शिकु लागल्या, धाडसाने पुढे येऊ लागल्या, लिहू, बोलू लागल्या. इतिहास संशोधक, लेखक, अभ्यासक, व्याख्यात्या, शाहीर, कीर्तनकार, कलागुणसंपन्न कलाकार म्हणून समाजामध्ये नावारूपाला आल्या व समाजाचे प्रबोधन करू लागल्या. महिलांचे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक , शैक्षणिक विश्व ढवळून निघाले हे मराठा सेवा संघाच्या प्रयत्नांचे यश आहे.
मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा अनेक वर्षे चाललेला वाद थांबवला. १९ फेब्रुवारी १६३० ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख सप्रमाण सिद्ध केली. जिजाऊंची अधिकृत प्रतिमा तयार केली. मुंबईत मंत्रालयात जिजाऊंचे तैलचित्र लावले. जिजाऊंचे चित्र आणि चरित्र घराघरात आणि जगभरात पोहोचवले. जिजाऊ वंदना घराघरात आणि जगभरात पोहोचली. मराठा सेवा संघाने मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे सुरू केलेला जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा लोकोत्सव झाला. सिंदखेड राजाचे ऐतिहासिक महत्त्व जगभरात पोहोचले. शेकडो एकर मध्ये जिजाऊसृष्टीसारखा विशाल व महत्त्वकांक्षी प्रकल्प उभा राहिला. जगभरातून लोक स्वखर्चाने तेथे येऊ लागले. मातृतीर्थ सिंदखेडराजा हे कोट्यावधी मराठा बहुजन समाजाचे प्रेरणास्थान झाले. दरवर्षी कोट्यावधी रुपयाची पुस्तके त्याठिकाणी विकली जाऊ लागली. ०३ जानेवारी ते १२ जानेवारी सावित्री ते जिजाऊ दशरात्रोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे, परिवर्तनाचे, विचारांचे सोहळे सजू लागले ते मराठा सेवा संघामुळे. त्याचबरोबर शिवजन्मोत्सव सोहळा, शंभू जन्मोत्सव सोहळा, शिवराज्याभिषेकदिन सोहळा असे विचारांचे व प्रबोधनाचे सोहळे सजवण्यामध्ये, जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा अशा परवलीच्या घोषणा समाजात रुजवण्यामध्ये मराठा सेवा संघाची भूमिका महत्त्वाची आहे.
मराठा सेवा संघाच्या वैचारिक प्रबोधनाच्या, परिवर्तनाच्या चळवळीमुळे मराठा बहुजन समाजाच्या घरातील नवस – सायास, व्रतवैकल्य, अंधश्रद्धा, कर्मकांडे बऱ्याच प्रमाणात कमी झाली, त्यातून होणारा पैशाचा अपव्यय बऱ्यापैकी थांबला. अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून विज्ञानाकडे असा प्रवास सुरू झाला. मराठा बहुजन समाज वाचायला लागला, विचार करायला लागला, चिकित्सा करायला लागला. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर घासुन आणि तपासूनच स्वीकारायची या मानसिकतेपर्यंत येऊन पोहोचला. खुळचट कल्पना, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, भाकडकथा, चुकीच्या समजुती यापासून दूर जाऊ लागला तो मराठा सेवा संघामुळे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही प्रथम मागणी करणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ. सुरुवातीच्या काळामध्ये मराठा सेवा संघाला मराठा समाजाच्या विरोधाला, रोषाला सामोरे जावे लागले. मराठा सेवा संघ आम्हाला मागास बनवत आहे अशी आवई उठविणाऱ्या मराठ्यांना आता काळाच्या ओघात मराठा सेवा संघाची तेंव्हाची भूमिका व मागणी योग्य होती याची प्रचिती आली आहे. त्यासाठी मराठा सेवा संघाने सलग ३५ वर्ष अखंडितपणे, अथकपणे प्रयत्न केले. अनेक मेळावे, आंदोलने, मोर्चे, सभा, संमेलने यातून लोकांचे प्रबोधन केले. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज आम्ही कुणबी आहोत आणि आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक झाला आहे हे मराठा सेवा संघाच्या वैचारिक प्रबोधनाचे यश आहे.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मराठा मुला मुलींसाठी विद्यार्थी वस्तीगृहे उभी राहिली आहेत, बळीराजा संशोधन संस्था उभी राहिली. मराठा सेवा संघाच्या प्रेरणेतून अनेक सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था, शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या व समाजाच्या उन्नती मध्ये आपले योगदान देऊ लागल्या.
मराठा बहुजनांचे मन मेंदू आणि मनगट सशक्त करणारी संघटना, रचनात्मक, सृजनात्मक कार्यावर भर देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ अशी या संघटनेची ओळख निर्माण झाली. मराठा सेवा संघामुळे कित्येकांच्या आयुष्याचं सोनं झालं. वारकरी संत आणि बहुजन महामानवांनी सुरू केलेल्या प्रबोधनाच्या, परिवर्तनाच्या चळवळीला बळ मिळालं. ज्या संघटनेसमोर आकाश ठेंगणं वाटावं अशी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ. केवळ प्रतिक्रियावादापेक्षा क्रियावादाला अधिक प्राधान्य देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ.
जगाला फुलांनी फळांनी लगडलेला भव्य आणि सुंदर वृक्ष दिसतो पण जमिनीखाली गाडून घेतलेली त्याची बी कधीच दिसत नाही. त्या बी ने स्वतःला गाडून घेतलेलं असतं म्हणूनच त्या वृक्षाची भव्यता आणि फुलं फळं लोकांच्या नजरेत भरतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एका बिजा केला नासं l मग भोगीले कणीस ll संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या संतवचनाप्रमाणे चांगले उदात्त कार्य जेव्हा समोर दिसते तेव्हा त्यासाठी त्या व्यक्तीने, समूहाने , संस्थेने घेतलेले अपार कष्ट मात्र दिसून येत नाहीत. आज मराठा सेवा संघाचे जे विशाल रूप आपल्या दृष्टीस पडत आहे त्यामागे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब, प्रा. मा. म. देशमुख, डॉ. आ. ह. साळुंखे, चंद्रशेखर शिखरे, प्रविण गायकवाड, गंगाधर बनबरे, श्रीमंत कोकाटे, प्रदिप सोळुंके यांच्यासह साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम करणारे त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या असीम त्यागाचे फळ म्हणजे मराठा सेवा संघ होय.
आज मराठा सेवा संघ व्यक्ती, समूह किंवा संस्था एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो एक विचार झालेला आहे. जो विचार जगभरात पोहोचला आहे. व्यक्ती, समूह, संस्था यांना काळाची मर्यादा असते. ते येतात आणि जातात पण विचार मात्र कायम राहतात. उद्या मराठा सेवा संघात काम करणाऱ्या व्यक्ती असतील नसतील, समूह असतील नसतील, संस्था असतील नसतील परंतु हा विचार मात्र चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आणि त्यानंतरही कायम राहील. असा चिरंतन विचार देणाऱ्या मराठा सेवा संघाला आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना, सर्व मराठा बहुजन समाज बांधवांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



