पिढीतेला तात्काळ न्याय द्या ; आमदार रोहित पवारांचे विधानसभेत सवाल !

पिढीतेला तात्काळ न्याय द्या ; आमदार रोहित पवारांचे विधानसभेत सवाल !
सराईत आरोपी मोकाट …सरकारचे नैतिक जबाबदारी कुठे?
जामखेड प्रतिनिधी –जामखेड तालुक्यातील नान्नज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी रविवारी (२९ जून) दुपारी सुमारास सामान खरेदीसाठी स्थानिक दुकानात गेली असता, तेथे उपस्थित असलेल्या मनोज महादेव हुंबे (वय २५, रा. बोर्ले, ता. जामखेड) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने पीडितेला त्यांच्या घराजवळील गोडाऊनमध्ये नेले.
यावेळी अल्पवयीन मित्राने पीडितेचे तोंड दाबून हात पकडले, तर मुख्य आरोपी मनोज हुंबे याने अत्याचार केला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पळून गेले. पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर, तिच्या आई – वडील यांनी तात्काळ जामखेड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोघांविरोधात गंभीर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या घटनेची दखल घेत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत संतप्त प्रतिक्रिया नोंदवत सरकारवर कडवी टीका केली. सराईत आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे, हे सरकारच्या आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं,अशी घणाघाती टीका करत त्यांनी तात्काळ अटकेची मागणी केली.
आरोपींना तातडीने अटक करून पीडितेला तात्काळ न्याय देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या माध्यमातून सरकारकडे केली. अपेक्षा आहे, सरकार या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता आरोपीच्या मुसक्या आवळेल!



