सारोळ्यात डीपी बिघाडावर झपाट्याने उपाय ; खर्डा कक्षाची कौतुकास्पद कामगिरी

सारोळ्यात डीपी बिघाडावर झपाट्याने उपाय ; खर्डा कक्षाची कौतुकास्पद कामगिरी
जामखेड ( प्रतिनिधी) : दिनांक 22 मे 2025 रोजी सारोळा गावठाणातील डीपी अचानक बंद पडल्याने संपूर्ण गाव दिवसभर अंधारात होता. सरपंच अजय काशिद व सारोळा ग्रामस्थ यांनी तत्काळ महावितरणचे अधिकारी अनिकेत कांडेकर यांना संपर्क साधून स्थितीची माहिती दिली.
परिस्थितीची गंभीरता ओळखून श्री माऊली इलेक्ट्रिकल्स एजन्सीचे दादासाहेब श्रीरामे आणि भाऊसाहेब मासाळ यांनी कर्जत येथून तातडीने जॉब (साहित्य) पिकअपमधून पाठवला. मात्र पावसामुळे आणि रस्त्यावरील चिखलामुळे पिकअप जॉब गावठाणात पोहोचवू शकत नव्हता.
यावेळी अधिकारी अनिकेत कांडेकर यांनी धाडस दाखवत लाईनमन अर्जुन अडसूळ आणि गणेश काटे यांना घेऊन पावसातच ट्रॅक्टर बोलावून, ग्रामस्थांच्या मदतीने जॉब ट्रॅक्टरमध्ये ठेवला आणि गावठाणात जाऊन तात्काळ डीपी बसवली. या जलद कार्यवाहीमुळे गावात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कामी खर्डा कक्षा चे सहाय्यक अभियंता अनिकेत कांडेकर, लाईनस्टाफ अर्जुन अडसूळ, गणेश काटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
चौकट बातमी:
जामखेड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप कटकझोड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास महावितरण 24 तास सेवेसाठी तत्पर आहे, असेही त्यांनी सांगितले.



