📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना ‘मातोश्री’चा शैक्षणिक मदतीचा हात!

दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना ‘मातोश्री’चा शैक्षणिक मदतीचा हात!
आज दि. २४ ऑक्टोबर २०२६  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड यांच्या वतीने काठोडा येथील गीते वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील एकूण १२ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवते. शेतीतील उत्पन्न घटल्याने अनेक कुटुंबांना दैनंदिन गरजा भागवतानाच मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे कठीण होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याअभावी अडचणी येऊ नयेत आणि त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने संस्थेने हा सामाजिक उपक्रम राबविला.
या वेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग तसेच बोरसे पटपट इंग्लिश, उजनी पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मदत होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान संस्थेचे सचिव तेजस पवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हेच उज्ज्वल भविष्य घडविण्याचे प्रभावी साधन असून विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा, वेळेचे नियोजन करावे, जिद्द व चिकाटीने ध्येय गाठावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे प्रमुख राऊत सर, संस्थेचे सचिव तेजस पवार, संस्थेचे सदस्य तसेच तुषार, अभिषेक आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणे, ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, या उद्देशाने मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड यांच्याकडून राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
Back to top button