📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

रिपाइंची दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक धान्याची मदत बीड जिल्ह्याला पहिला ट्रक रवाना, आठवले म्हणाले, पक्ष बौद्ध वाड्याच्या बाहेर न्या

रिपाइंची दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक धान्याची मदत

बीड जिल्ह्याला पहिला ट्रक रवाना, आठवले म्हणाले, पक्ष बौद्ध वाड्याच्या बाहेर न्या

मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळ पडला असून शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी संकटात आहेत. त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं ) वतीने १०० ट्रक धान्याचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं अध्यक्ष रामादास आठवले यांनी केली.नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरामध्ये रिपाइंचा ६९ वा वर्धापन दिन रविवारी मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी झालेल्या पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री आठवले यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सीमा आठवले, जित आठवले, रिपाइं राज्य अध्यक्ष राजा सरवदे, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे,काकासाहेब खंबाळकर, बाबुराव कदम, गौतम सोनवणे,  कोषाध्यक्ष एम. एस. नंदा उपस्थित होते.रिपाइं पक्ष केवळ बौद्धवाड्यापुरता मर्यादित ठेवायचा नाही. रिपाइं सर्व जाती-धर्मांचा पक्ष बनवायचा आहे. पक्षाची वाटचाल २८ राज्यांमध्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये होत असून नागालँड आणि मणीपूर या राज्यांमध्ये ‘ऊस उत्पादक शेतकरी’ हे निवडणूक चिन्ह पक्षाला मिळाले आहे. रिपब्लिकन पक्ष संघर्ष करणारा आहे. सामाजिक न्यायाची लढाई लढणारा पक्ष आहे. आपण सत्तेत नक्कीच आहोत, पण अन्याय झाला तर कोपऱ्यात शांत बसू नका. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरा, असे आवाहन मंत्री आठवले यांनी केले. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. महाडच्या चवदार तळे क्रांतीच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेला यंदाचा ‘समता क्रांती मार्च’ दुष्काळामुळे आपण रद्द केला आहे. दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना मदत केली पाहिजे. त्यासाठी रिपब्लिकन पक्ष गरीब असला तरी शंभर ट्रक जीवनावश्यक वस्तूंची मदत दुष्काळग्रस्तांना पाठवणार आहे, असे मंत्री आठवले यांनी जाहीर केले. ‘दुष्काळामुळे शेतकऱ्याचे पीक गेले जळून, तरी सरकार मदतीपासून नाही जाणार पळून’ अशी चारोळी मंत्री आठवले यांनी केली.रिपब्लिकन पक्षाची ताकत कार्यकर्ते आहेत. ती ताकद कार्यकर्त्यांनी दाखवली पाहिजे. प्रत्येक वेळी मित्र पक्षाच्या मागे लागायचे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली ताकत दाखवा. आपले लोक निवडून आणा. त्यासाठी पक्ष बांधणी करा. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करा, असे आवाहन मंत्री आठवले यांनी वर्धापन दिनाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केले.

Back to top button