📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आदित्य कृषी महाविद्यालयात विद्यार्थी विकास, क्रीडा व शैक्षणिक सुविधा; विद्यापीठाकडून शिक्षण संस्थेचा गौरव

आदित्य कृषी महाविद्यालयात विद्यार्थी विकास, क्रीडा व शैक्षणिक सुविधा; विद्यापीठाकडून शिक्षण संस्थेचा गौरव
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बीडमध्ये उभारल्या राष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा
प्रतिनिधी | बीड
अमृतकाळातील विकसित भारताच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व व्यावसायिक संधींचा पुरेपूर लाभ घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. शिक्षणासोबतच शेतकरी, ग्रामीण समाज आणि उद्योजकतेशी नाते जोडून भविष्यात सक्षम व जबाबदार नागरिक म्हणून पुढे यावे, असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले.
आदित्य शिक्षण संस्था बीड संचलित व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्नित आदित्य कृषी महाविद्यालय, बीड येथे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा रावे कार्यक्रमाचे विद्यापीठ समन्वयक डॉ. राजेश कदम यांनी भेट देऊन महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, क्रीडा व विद्यार्थी विकासाच्या सुविधांची पाहणी केली. यावेळी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारपुरे उपस्थित होते.
डॉ. कदम यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील विविध विभाग, क्रीडांगणे, हिरवाईने नटलेला ग्रीन कॅम्पस, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा तसेच संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आधुनिक मल्टीस्पोर्ट कॉम्प्लेक्स (टर्फ) ची पाहणी केली. कृषी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अशा अत्याधुनिक पद्धतीचे मल्टीस्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारण्यात आल्याबद्दल त्यांनी आदित्य शिक्षण संस्था व महाविद्यालयाचे विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन केले.
यावेळी डॉ. राजेश कदम हे विद्यापीठाचे रावे कार्यक्रमाचे समन्वयक असल्याने त्यांनी महाविद्यालयातील रावेच्या विद्यार्थ्यांशी हितगुज केले. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये जाऊन केलेल्या कृषीविषयक, सामाजिक व जनजागृतीपर कामांची त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध रील्स व उपक्रमांचे त्यांनी प्रत्यक्ष अवलोकन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या कामात आणखी नावीन्य आणण्याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यापुरते शिक्षण न घेता शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेऊन विद्यापीठ व शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करावे, असे डॉ. कदम यांनी सांगितले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतः शेतकरी, कृषी व्यावसायिक तसेच भविष्यात यशस्वी उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, कौशल्यविकास व सकारात्मक दृष्टिकोन जोपासावा,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारपुरे यांनी आदित्य कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी विद्यापीठाच्या विविध संघांमध्ये केलेला सहभाग तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.महाविद्यालयाच्या परिसरातील बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस तसेच मल्टीस्पोर्ट कॉम्प्लेक्स यांसारख्या सुविधांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आदित्य कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा आणि संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक, क्रीडा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती प्राचार्य भुतडा यांनी दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. रामप्रसाद मोरे, रावे कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.बी.सातपुते, राष्ट्रीय सेवा योजना गटप्रमुख डॉ.पी.डी.खेडकर, तसेच डॉ. वीरेंद्र कुमार, डॉ. एन.यू. ठोके, प्रा. व्हि.एस मिसाळ,प्रा.एस.जी.बोरडकर, प्रा.ओ.एन.राऊत, प्रा. धावणे, यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक डॉ. डी. बी. सातपुते यांनी  तर आभार डॉ. रामप्रसाद मोरे यांनी मानले.
Back to top button