📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पैशाचं झाड’ लक्ष्यवेधी आंदोलन; वनविभागातील  गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पैशाचं झाड’ लक्ष्यवेधी आंदोलन; वनविभागातील  गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
 हरित अभियानातील ४२ कोटींच्या वृक्षलागवड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे
बीड:-( दि.१५) : बीड जिल्ह्यातील वनविभागातील वनीकरणासह इतर कामांमध्ये सुरू असलेल्या  अनागोंदी कारभार, अनियमितता आणि गैरव्यवहारांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘वनविभागातील झाडांना पैसे’ हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात डॉ. गणेश ढवळे यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटकर आणि मुजीब इनामदार यांनी सहभाग घेतला. हरित अभियानांतर्गत ४२ कोटी रुपये खर्च करून कागदोपत्री वृक्षलागवड करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
यावेळी प्रादेशिक विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, वनविभागातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा लेखी निवेदने देऊन चौकशीची मागणी केली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन आणि वनविभागातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी श्रीनिवास लखमावाड यांना ४५ लाख रुपयांच्या  लाच प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांना सेवेतून बडतर्फ करून संबंधित सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
 डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
 मो. ८१८०९२७५७२
Back to top button