बीड
पालांदूर पोलिसांचा रेतीमाफियांवर घणाघात! ७.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; ट्रॅक्टर जप्त, पण रेतीचे जाळे अजूनही सक्रिय?

पालांदूर पोलिसांचा रेतीमाफियांवर घणाघात! ७.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; ट्रॅक्टर जप्त, पण रेतीचे जाळे अजूनही सक्रिय?
गुप्त माहितीवर सापळा; तलावाजवळ रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडला, परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याच्या चर्चांना उधाण
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
पालांदूर:- पालांदूर पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई करत पालादूर–लाखनी रोडवरील तलावाजवळ सापळा रचून रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडला. या कारवाईत एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती हस्तगत करण्यात आली आहे. मात्र या कारवाईनंतरही परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पालांदूर पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना संशयित ट्रॅक्टर थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ट्रॅक्टरमध्ये अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहन व संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात समीर जयेन्द्र मेश्राम (वय २०, रा. लोहारा, ता. लाखनी) आणि विवेक उध्दव झलके (रा. खराशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालामध्ये जॉन डिअर ट्रॅक्टर (₹६ लाख), ट्रॉली (₹१ लाख) आणि रेती (₹६ हजार) यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हेमणे व पालांदूर पोलीस पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार पालांदूर परिसरात रेती उत्खनन आणि वाहतुकीचे जाळे सक्रिय असल्याची जोरदार चर्चा आहे. काही भागांत दिवसाढवळ्या रेती उपसा सुरू असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे पोलिसांनी केवळ ट्रॅक्टर जप्त करून केलेली कारवाई महत्त्वाची असली तरी संपूर्ण रेती साखळीवर बडगा कधी उगारला जाणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
__________चौकट_________
पालादूर–लाखनी रोड परिसरात पालांदूर पोलिसांची धडक कारवाई
गुप्त माहितीवरून रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
एकूण ७.०६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती हस्तगत
दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
परिसरात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याच्या जोरदार चर्चा
रेतीमाफियांचे नेटवर्क अजूनही सक्रिय असल्याची स्थानिकांत चर्चा
पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष
“एक ट्रॅक्टर जप्त… पण रेतीमाफियांचे संपूर्ण नेटवर्क अजूनही सक्रिय? पालांदूरमध्ये कारवाईनंतरही प्रश्न कायम!”



