बीड
अंबाजोगाईत २.२६ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट; पोलिसांची धडक कारवाई

अंबाजोगाईत २.२६ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट; पोलिसांची धडक कारवाई
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी, बालाजी देशमुख; अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ लाख २६ हजार २७५ रुपयांचा अवैध दारूसाठा न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी नष्ट करण्यात आला. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली असून अवैध मद्यविक्री करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (एसओपी) संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्यांतील दारू पंचांसमक्ष जमिनीत ओतून नष्ट करण्यात आली.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल असलेल्या एकूण ४८ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५ मध्ये पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूविरोधात १२० यशस्वी कारवाया करण्यात आल्या आहेत. चालू वर्षातही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून अवैध दारूची वाहतूक, विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक चेतना आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी फड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केदार, पोलीस हवालदार अमोल गायकवाड, बाबासाहेब पोटभरे, महिला पोलीस हवालदार शितल धायगुडे, पोलीस अंमलदार सुशांत गायकवाड, अमोल वावळे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक चौरे व त्यांचे पथक उपस्थित होते.



