बीड

पंचशील-अष्टांगिक मार्गाने समाजात परिवर्तन भिक्खु विनयरक्खीता महाथेरो यांची धम्मदेसना

पंचशील-अष्टांगिक मार्गाने समाजात परिवर्तन
भिक्खु विनयरक्खीता महाथेरो यांची धम्मदेसना
बीड/प्रतिनिधी
बौद्ध धम्मात सांगितलेले पंचशील हे केवळ नियम नसून, एक सुसंस्कृत आणि शांततामय जीवन जगण्याचा पाया आहे. प्रत्येक व्यक्तीने पंचशीलाचे प्रामाणिकपणे पालन केले, तर समाजात नैतिकता, विश्वास आणि बंधुभाव दृढ होईल. तसेच अष्टांगिक मार्गाच्या आचरणातून विचार सकारात्मक होतील आणि जीवनाला खरी दिशा मिळेल, अशी धम्मदेसना
पूज्य विपश्यनाचार्य भिक्खु विनयरक्खीता महाथेरो यांनी उपस्थित समाज बांधवाना दिली.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंती निमित्ताने बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दि.5 ते 14 एप्रिल या कालावधीत जयभीम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने रविवार दि.5 एप्रिल रोजी आयोजित धम्मदेसना कार्यक्रमात पूज्य विपश्यनाचार्य भिक्खु विनयरक्खीता महाथेरो बोलत होते.यावेळी भिक्खु धम्मशिल महाथेरो, भिक्खु पय्यावर्धन, भिक्खु ज्ञानबोधी, भिक्खु अमोलरत्न, बुद्धबोधी तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदीप उपरे , संपादक नितीन मुजमुले, सुभाष गायकवाड, धर्मराज मुजमुले उपस्थित होते.
    धम्मदेसना देतांना भिक्खु विनयरक्खीता महाथेरो म्हणले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारून केवळ स्वतःचा नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचा उद्धार करण्याचे महान कार्य केले. त्यांनी दिलेले भारतीय संविधान आणि बौद्ध धम्म ही दोन अमूल्य देणग्या समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा मार्ग दाखवतात. आज आपण जे उच्च, सन्मानजनक जीवन जगत आहोत, ते त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले आहे.बाबासाहेबांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन मानले. त्यांनी सांगितलेले “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हे तत्त्व आजही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, आजच्या समाजात काही शिकले-सवरलेले लोक केवळ स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादित राहिलेले दिसतात. तसेच, समाजाने कर्मकांड, अंधश्रद्धा आणि बाह्य दिखाव्यापासून दूर जाऊन बौद्ध धम्मातील तर्क, विज्ञान आणि मानवतावादी मूल्ये स्वीकारणे गरजेचे आहे. प्रज्ञा (ज्ञान), शील (नैतिकता) आणि करुणा (दया) या त्रिसूत्रीवर आधारित जीवनच खऱ्या अर्थाने समृद्ध आणि समाधानकारक ठरते. त्यानुसार आचरण केल्यासच एक सशक्त, समतामूलक आणि प्रगत समाज निर्माण होऊ शकतो.असे भिक्खु विनयरक्खीता महाथेरो म्हणाले. धम्मदीसना कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद सरपते, सूत्र संचालन प्रा. पांडुरंग सुतार यांनी तर आभार इंजि. स्वप्नील चोपडे यांनी केले. दरम्यान जयभीम महोत्सवात साजरा होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने केले आहे.


Back to top button