बीड
गट-तट बाजूला सारा, आरक्षणासाठी एकवटून दीपक बोराडें च्या पाठीशी उभे राहा: सरपंच मोहन देवकते.

गट-तट बाजूला सारा, आरक्षणासाठी एकवटून दीपक बोराडें च्या पाठीशी उभे राहा: सरपंच मोहन देवकते.
१६ मार्चला आझाद मैदानात होणारी गर्दी सरकारचे डोळे उघडणारी असेल.
बीड प्रतिनिधी
प्रलंबित असलेल्या धनगर समाजाच्या एसटी (ST) आरक्षणाचा मुद्दा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. या मागणीसाठी आगामी १६ मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धनगर समाजाचे विराट ‘पिवळे वादळ’ धडकणार आहे.या पार्श्वभूमीवर, “आरक्षणासाठी सहकार्य करा, तरच धनगर समाज तुम्हाला मतदानाचा आशीर्वाद देईल,” असा थेट इशारा सरपंच मोहन देवकते यांनी राजकीय नेत्यांना आणि भावी उमेदवारांना दिला आहे.राज्यात लवकरच दुसर्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सरपंच मोहन देवकते यांनी स्पष्ट केले की, जे भावी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा सरपंच समाजाच्या आरक्षणासाठी मैदानात उतरणार नाहीत, त्यांना येणाऱ्या काळात धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. “आरक्षण नाही, तर मतदान नाही” ही भूमिका समाजाने आता ठामपणे घेतली आहे.गट-तट सोडून एकत्र येण्याचे आवाहन राज्यातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी आपापले हेवेदावे आणि गट-तट बाजूला ठेवून संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजाच्या जीवावर आपली राजकीय ‘दुकानदारी’ चालवणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांनी आता सावध व्हावे, अन्यथा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही या निमित्ताने देण्यात आला आहे.”अभी नही तो कभी नही” असा नारा देत, राज्यातील कानाकोपऱ्यातून धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने १६ मार्चला मुंबईत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही एकजुटीची शेवटची संधी असल्याचे मानले जात आहे.”धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आता वेळ आली आहे आपली ताकद दाखवण्याची. १६ मार्चला आझाद मैदानात होणारी गर्दी सरकारचे डोळे उघडणारी असेल.असे सरपंच मोहन देवकते यांनी मत व्यक्त केले”या आंदोलनामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, सरकार धनगर समाजाच्या या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


