बीड

पोलीस पाटील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी :- अँड अमोल डोंगरे 

पोलीस पाटील भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
:- अँड अमोल डोंगरे
माजलगाव : प्रतिनिधी
उपविभागीय कार्यालय माजलगाव अंतर्गत होत असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील एम. टेक मल्टी सर्विसेस या कंपनीवर प्रचलित नियमानुसार गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपविभाग माजलगाव अंतर्गत रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, शासन निर्णयानुसार ८० गुणांच्या परीक्षेत किमान ३६ गुण (४५ टक्के) आवश्यक असताना त्यापेक्षा कमी गुण मिळवलेल्या उमेदवारांची नावे यादीत समाविष्ट असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच किमान गुणांपेक्षा अधिक गुण मिळवून गुणवत्ता यादीत असलेल्या काही पात्र उमेदवारांची नावे वगळण्यात आल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेली यादी तत्काळ रद्द करून सुधारित व अधिकृत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करावी, तसेच संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन हेमंत गोरे, अशोक काळे, नामदेव सवासे, पांडुरंग काळे, अविनाश लवटे, रुपाली नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले असून, निवेदक म्हणून अॅड. अमोल डोंगरे, जिल्हा प्रभारी, बीड – बहुजन समाज पार्टी यांनी पाठपुरावा केला आहे.
Back to top button