बीड

बोर्लीपंचतन येथे ४० वा ‘भगवा चषक’ टेनिस क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार समारोप; नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर यांचा सत्कार

बोर्लीपंचतन येथे ४० वा ‘भगवा चषक’ टेनिस क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार समारोप; नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर यांचा सत्कार

श्रीवर्धन (संदेश घोलप) : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे श्री चिंचबादेवी क्रिकेट क्लब आयोजित ४० वा क्रिडा महोत्सव ‘भगवा चषक’ टेनिस क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जात असून यंदाही स्पर्धेला खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अंतिम सामन्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक आणि पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक करताना क्रीडाभाव जपण्याचे आवाहन केले. ग्रामीण पातळीवर अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळते आणि त्यांच्यातील कौशल्याला चालना मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्यात नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याची दखल घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या मनोगतात त्यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमास श्याम भोकरे, पंचायत समिती सदस्य सुकुमार तोंडलेकर, कुणाल पेडणेकर, गौरव तोंडलेकर, रफीक जहागीरदार, संदेश म्हसकर, सागर इंगळे, भाऊ साळुंखे, यश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, माजी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे नियोजन, मैदानाची व्यवस्था, पंचांची कामगिरी आणि शिस्तबद्ध आयोजन याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. ४० वर्षांची परंपरा जपत ‘भगवा चषक’ स्पर्धेने पुन्हा एकदा क्रीडाप्रेमींच्या मनात आपले वेगळे स्थान अधोरेखित केले आहे.
ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. आगामी काळात स्पर्धा आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

Back to top button