बीड

पुढचा चंपावती महोत्सव बीडच्या अद्यावत नाट्यगृहात होईल; आ. विजयसिंह पंडीत यांची ग्वाही!

पुढचा चंपावती महोत्सव बीडच्या अद्यावत नाट्यगृहात होईल; आ. विजयसिंह पंडीत यांची ग्वाही!
*कलाकारांच्या मागण्या पूर्ण करणे ही आता आपली सामूहिक जबाबदारी- अनिलदादा जगताप*
======================
बीड, प्रतिनिधी- कलेचं महावैभव लाभलेल्या बीड जिल्ह्यात नव कलाकारांची सुजाण पिढी घडवण्याचं महत्त्वाचं काम चंपावती महोत्सव करत आहे. आजवर नाट्यगृहातील सुविधांच्या अभावामुळे कलाकारांना मोठा छळ सहन करावा लागला. मात्र आता नाट्यगृहाच्या दुरुस्ती व अद्ययावत सुविधांसाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कलाकारांच्या हक्काच्या नाट्यगृहाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. पुढील चंपावती महोत्सव अद्यावत नाट्यगृहातच उभा राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आणि चंपावती महोत्सव अविरत टिकविण्यासाठी आम्ही सर्व पुढाकार घेऊ असे प्रतिपादन दिले.
काल दिनांक ८ फेब्रुवारी २०२० रोजी अनिलदादा जगताप फाउंडेशन आणि शिवसेना बीड आयोजित चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे महाकरंडक स्पर्धेअंतर्गत इंग्रजी माध्यमातील समूह नृत्य, जोडी नृत्य व एकपात्री अभिनय स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा राष्ट्रवादीचे नेते आमदार विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, राष्ट्रवादीचे गटनेते फारुख पटेल, शिवसेनेचे नगरसेवक व बांधकाम सभापती संजय उडान, राष्ट्रवादीचे स्वच्छता सभापती शेख निजाम, बाळासाहेब गुंजाळ, नगरसेविका रेशमा सरवदे, मोमीन सीमा परवीन, नगरसेवक जैतुल्ला खान, सीता मोरे, भैय्यासाहेब मोरे, महंमद नुझहत आरा मुनिरुद्दीन, शेख अशफाक शेख इशाक, मनोज गोडसे, शिवसेनेचे नगरसेवक सूरज चुंगडे, शितल चक्रे, एमआयएमचे नगरसेवक सय्यद इलियाज हमीद, नगरसेवक दिनेश मुंदडा, भीमराव वाघचौरे, रणजित बनसोडे, प्रमोद शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक चंपावती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी केले. याबरोबरच बीड नाट्यगृहाच्या नूतनीकरणास तात्काळ सुरुवात व्हावी, हे नूतनीकरण कलाकारांच्या देखरेखीखाली पार पडावे. तसेच अद्यावत नाट्यगृहात केवळ संस्कृतीक कार्यक्रमच व्हावेत. अशी इच्छा बीड कलाकारांच्या वतीने व्यक्त केली. कलाकारांच्या यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी कलाकारांच्या मागण्या पूर्ण करणे ही आता आपली सामूहिक जबाबदारी असून कलाकारांच्या कलागुणांना समृद्ध करणारा चंपावती महोत्सव अविरत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फारुख पटेल यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप व कलावंत प्रतीक कांबळे यांनी बालकलाकारांसाठी सुरू केलेला चंपावती महोत्सव आज बीड जिल्ह्याची मोठी सांस्कृतिक चळवळ व कला क्षेत्राची भावना बनल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.
*बीड नाट्यगृह दुरुस्तीसाठी साडेआठ कोटींचा निधी; एकही रुपया वाया जाणार नाही- विनोद मुळूक*
बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांनी नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करून साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती दिली. हा निधी पूर्णपणे कलाकारांच्या नाट्यगृहाच्या दुरुस्ती व अद्ययावत सुविधांसाठीच वापरण्यात येणार असून त्यातील एकही रुपया वाया घालवला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या निधीचा पारदर्शक वापर केला जाईल तसेच संपूर्ण खर्चाचा हिशोब नागरिकांसमोर मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या ठाम भूमिकेचे उपस्थित कलाकार व रसिक श्रोत्यांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत समाधान व्यक्त केले.
•••••
Back to top button