बीड
रासेयो शिबिरातून स्वच्छतेची जनजागृती; ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रासेयो शिबिरातून स्वच्छतेची जनजागृती; ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड (प्रतिनिधी): देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी महाविद्यालय, बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे शिवणी येथे सुरू असलेल्या सातदिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरांतर्गत ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ हा उपक्रम शुक्रवारी उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर तसेच विविध भागांची स्वच्छता करून ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी गावाजवळील नदी स्वच्छ करून जलसंवर्धनाचा संदेश दिला. नदी परिसरातील कचरा व गाळ काढून नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच शोषखड्डे व पाझर खड्डे तयार करून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याबाबतही जनजागृती करण्यात आली.
ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत उत्स्फूर्त सहकार्य केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सुनील जोंधळे, प्रा. किशोर वाघमारे, प्रा.सुरेश वाघमारे, प्रा.श्वेता वंजारे, प्रा. वृषाली लोखंडे, प्रा. सुप्रिया ससाणे तसेच प्रा.रंजना जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने आणि उत्साहाने या मोहिमेत सहभागी झाले होते.



