बीड
तुलसी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पलक सावंतची देशसेवेसाठी निवड

तुलसी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पलक सावंतची देशसेवेसाठी निवड
बीड (प्रतिनिधी) : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथील बीसीए तृतीय वर्गाची विद्यार्थिनी पलक सूरज सावंत हिची नुकतीच सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये निवड झाली असून पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.
पलक सावंत सध्या बीसीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिने देशसेवेचे ध्येय उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभागामार्फत देण्यात येणारे नियमित मार्गदर्शन आणि तिची स्वतःची मेहनत यांच्या जोरावर तिने सीमा सुरक्षा दलाच्या परीक्षेत यश मिळवले.
पलकच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तुलसी शैक्षणिक समूहचे संचालक मा.प्रा.प्रदीप रोडे, मुख्याध्यापक मा.राम वाघुंबरे,मा.अतुल मुळे,मा.प्रा.अर्जुन राठोड तसेच प्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे यांच्या हस्ते पलकचा प्रेरणादायी पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि तिच्या मेहनत व चिकाटीचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातून यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलात व विविध शासकीय सेवांमध्ये यश मिळवले आहे. पलकच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


