बीड
येवता येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

येवता येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील येवता येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण केज तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे.
दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, केज यांच्या संयुक्त विद्यमाने येवता, ता. केज येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रमास उपस्थित येवता गावचे सरपंच विलास अप्पा जोगदंड, उपसरपंच बाळासाहेब सक्राते,जनहित मराठी न्युजचे संपादक वसंत सोनवणे,मंडळ कृषी अधिकारी प्रदीप कोठावळे,कृषि विज्ञान केंद्राचे पशु विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कोरके, कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके, सहाय्यक कृषी अधिकारी संजय गायकवाड, पांडुरंग घाटोळे, ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे, रमेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास पंके यांनी केले, सुहास पंके यांनी सांगितले की, देशातील गळीत धान्याचे उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी करण्याच्या उद्देशाने अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मार्गदर्शन करताना प्रदीप कोठावळे यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, महाविस्तार- एआय मोबाईल ॲप तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.
संजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नैसर्गिक शेती पद्धतीतील महत्त्वाचे घटक व त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
सरपंच विलास जोगदंड यांनी आपल्या भाषणात कृषी विभागाच्या योजना व कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी शेतीचा सर्वांगीण विकास करावा, तसेच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतीला जोड व्यवसाय निर्माण करण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना केले.
डॉ. रवींद्र कोरके यांनी पशुधन व्यवस्थापनामध्ये चारा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करत शाश्वत शेतीसाठी शेतीपूरक व्यवसायांची जोड आवश्यक असल्याचे सांगितले. यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन व पशुपालन करण्याचा सल्ला देत त्यांनी ‘सुरभी’ या पाचक सत्वाच्या माध्यमातून निकृष्ट चाऱ्याचे सकस चाऱ्यात रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
प्रशिक्षणाला उपस्थित शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील अडचणींबाबत रमेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले व लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सीआरपी श्रीमती अनुसया सोनवणे व धनंजय काळे यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी गावातील प्रतिष्ठान नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



