जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पोपट राळेभात तर स्विकृत सदस्य पदी प्रविण चोरडिया,पवन राळेभात व गणेश डोंगरे यांची निवड…

जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पोपट राळेभात तर स्विकृत सदस्य पदी प्रविण चोरडिया,पवन राळेभात व गणेश डोंगरे यांची निवड…
जामखेड प्रतिनिधी –जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पोपट दाजीराम राळेभात यांची निवड करण्यात आली असून, स्विकृत नगरसेवकपदी प्रविण चोरडिया, पवन राळेभात व गणेश डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
सभापती प्रा.राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जामखेड नगरपरिषद निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी करत घवघवीत यश मिळवले. भाजपाने नगराध्यक्ष पदासह एकूण १५ नगरसेवक निवडून आणत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदी प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी ३६८२ मतांच्या फरकाने विजय मिळवला असून हे पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गात गेले होते.
उपनगराध्यक्षपदासाठी सूचक म्हणून नगरसेवक ॲड.प्रविण सानप व अनुमोदक म्हणून प्राचार्य तथा नगरसेवक विकी घायतडक यांनी प्रस्ताव मांडला. त्यानुसार पोपट राळेभात यांची एकमताने निवड झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केले की, उपनगराध्यक्षपद पाच वर्षांत पाच नगरसेवकांना टप्प्याटप्प्याने देण्यात येणार असून पहिल्या वर्षाची संधी पोपट राळेभात यांना देण्यात आली आहे.
स्विकृत नगरसेवकपदी भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्रविण चोरडिया तसेच पवन राळेभात यांना संधी देण्यात आली असून त्यांच्या मातोश्री कमल महादेव राळेभात यांचा निवडणुकीत निसटता पराभव झाल्याने त्यांना ही संधी देण्यात आली आहे. तिसरे स्विकृत नगरसेवक म्हणून गणेश डोंगरे यांची निवड करण्यात आली असून भाजपाच्या विजयात त्यांनी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली. आमदार सुरेश धस यांचे ते एकनिष्ठ मानले जातात आणि जामखेडमध्ये त्यांचा मोठा समर्थकवर्ग असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली आहे.उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात तसेच स्विकृत नगरसेवक प्रविण चोरडिया, पवन राळेभात व गणेश डोंगरे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



