बीड

तटकरेंच्या दौऱ्यापूर्वी श्रीवर्धनमध्ये शिवसैनिक आक्रमक; शहरात बॅनर्स झळकावून विचारला जाब!

तटकरेंच्या दौऱ्यापूर्वी श्रीवर्धनमध्ये शिवसैनिक आक्रमक; शहरात बॅनर्स झळकावून विचारला जाब!
​”गेला कॉन्ट्रॅक्टर रविराज कोणीकडे?” २२.४१ लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट कंत्राटदाराचे नाव बॅनर्सवर; राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
​श्रीवर्धन (संदेश घोलप):
खासदार आणि आमदार यांच्या श्रीवर्धन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न आता अत्यंत उग्र बनला आहे. शिवसेना-श्रीवर्धन शहर संघटनेच्या वतीने शहरात सर्वत्र अत्यंत आक्रमक बॅनर्स झळकावण्यात आले असून, यामध्ये थेट पाणी योजनेच्या कंत्राटदाराचे नाव उघड करून सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला उघडे पाडण्यात आले आहे. “मानलं राव…!” असा टोमणा मारत शिवसैनिकांनी शहराच्या मुख्य चौकांमध्ये लावलेल्या या बॅनर्समुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
​हजारो लीटरची पाणीगळती दिसली नाही, म्हसळा येथील डम्पिंग ग्राउंडचा धूर मात्र दिसला!
​शहरात झळकलेल्या या अधिकृत बॅनरमध्ये थेट लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. श्रीवर्धनमध्ये दररोज हजारो लीटर शुद्ध पाण्याची गळती होत असताना ती ‘साहेबांच्या’ डोळ्याला दिसली नाही, मात्र म्हसळा डम्पिंग ग्राउंडचा धूर मात्र चटकन डोळ्यात शिरला, असा थेट आणि बोचरा हल्लाबोल शिवसैनिकांनी केला आहे. “का बरं आमच्या साहेबांचा पाईपलाईन प्रश्नाकडे कानाडोळा?” असा सवाल करत “इसिलिये बिचारी पब्लिक पुछने लगीं है ना बॉस…” अशी उपरोधिक टीका या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
​२२.४१ लाखांचा मलिदा मुरला कुठे? ‘कंत्राटदार रविराज’वर थेट निशाणा!
​महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजनेचा अक्षरशः सत्यानाश झाल्याचा थेट आरोप या बॅनरमध्ये पुरावा आणि आकड्यांसह करण्यात आला आहे. “गेला कॉन्ट्रॅक्टर रविराज कोणीकडे?” असा थेट सवाल विचारत, “रु. २२.४१ लक्ष कुठे कुठे मुरले?” आणि नगरपालिकेच्या या अतोनात आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण? असा अत्यंत गंभीर आणि कायदेशीर प्रश्न आता प्रशासनासमोर उभा केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करून कोट्यवधींच्या योजनेचा बोजवारा उडवणाऱ्या या कंत्राटदाराला पाठीशी नक्की कोण घालतंय, यावरून संशयाचे ढग गडद झाले आहेत.
​आम्हा करदात्यांचं नशीबच फुटकं हो!! जनतेचा आर्त टाहो
​बॅनरवर पाण्यासाठी हताश झालेल्या आणि डोक्याला हात लावलेल्या महिलेचे प्रातिनिधिक चित्र वापरून श्रीवर्धनकरांची खरी व्यथा मांडण्यात आली आहे. “गळक्या-फुटक्या पाईपलाईन कशाला? आम्हा करदात्यांचं नशीबच फुटकं हो!!” असा उद्वेगजनक संदेश लिहून, प्रामाणिकपणे कर भरूनही श्रीवर्धनच्या जनतेला पाण्याच्या थेंबा थेंबासाठी का तडफडावे लागत आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
​दौऱ्यापूर्वीच सत्ताधारी बॅकफूटवर; वेशीवकरांपाठोपाठ आता शिवसेनेचाही एल्गार!
​एककीडे नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पिंट्याशेठ वेश्विकर  यांनी घराणेशाही आणि पाणी योजनेवर तोफ डागली असतानाच, आता शिवसेना-श्रीवर्धन शहर संघटनेने थेट कंत्राटदाराचे नाव आणि भ्रष्टाचाराचा आकडा बॅनर्सवर जाहीर केल्यामुळे सत्ताधारी पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहेत. दौऱ्यावर येणाऱ्या बड्या नेत्यांना आता श्रीवर्धनची जनता आणि आक्रमक झालेले विरोधक पाण्याच्या एका-एका थेंबाचा आणि २२.४१ लाखांच्या भ्रष्टाचाराचा जाब विचारणार, हे आता स्पष्ट झाले आहे. या जनक्षोभामुळे आणि बॅनरबाजीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

Back to top button